Join us  

T20 World Cup : भारताच्या वाट्याला आज थोडं दुःख, थोडा आनंद आला! Group 2 Point Table मध्ये पाकिस्तानला मोठा दिलासा मिळाला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 6:17 PM

Open in App
1 / 9

T20 World Cup 2022, Check Group 2 Point Table : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर रोमहर्षक विजयाची नोंद केली. भारतीय संघ ग्रुप २ मध्ये आहे आणि त्यांच्यासमोर पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, झिम्बाब्वे व नेदरलँड्स यांचे आव्हान आहे. पण, आज भारतासाठी दिवस थोडा चांगला आणि थोडा वाईट ठरला. पण, पाकिस्तानला दिलासा मिळाला.

2 / 9

राऊंड १ मधून सुपर १२ मध्ये एन्ट्री घेणाऱ्या नेदरलँड्सने पहिल्याच सामन्यात तगड्या बांगलादेशला हिस्का दाखवला. पण, विजयापासून ऑरेंज आर्माला वंचित रहावे लागले. पॉल व्हॅन मिकेरेन ( २-२१) व बॅस डे लीड ( २-२९) यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केलीच, शिवाय त्यांना फ्रेड क्लासेन, टीम प्रिंगल, शरिज अहमद, लोगान व्हॅन बीक यांनी प्रत्येकी एक विकेट घेत उत्तम साथ दिली.

3 / 9

बांगलादेशच्या अफिफ होसैनने सर्वाधिक ३८ धावा केल्या, तर नजमुल होसैन शांतो ( २५) व मुसाडेक होसैन ( २०*) यांनीही योगदान देत ८ बाद १४४ धावा केल्या. तस्कीन अहमदने पहिल्याच षटकात सलग दोन विकेट्स घेतल्या. कॉलिन एकरमनने अर्धशतकी खेळी करून नेदरलँड्सची खिंड लढवली होती. नेदरलँड्सला १३५ धावा करता आल्या. तस्कीनने ४ विकेट्स घेतल्या.

4 / 9

ग्रुप २ मधील आजच्या दुसऱ्या सामन्यात पाऊस आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात छत्तीसचा आकडा असल्याची पुन्हा प्रचिती आली. झिम्बाब्वेविरुद्धच्या ९-९ षटकांच्या सामन्यात आफ्रिकेसमोर ८० धावांचे लक्ष्य होते. क्विंटन डी कॉकच्या फटकेबाजीच्या जोरावर आफ्रिकेने ३ षटकांत ५१ धावा चढवल्या अन् पुन्हा पाऊस सुरू झाला. त्यानंतर अम्पायर्सनी सामन रद्द करण्याचा निर्णय घेतला.

5 / 9

ग्रुप २ मधील दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यातला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे ९-९ षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेतला गेला. रेगिस चकाब्वा ( ८ ), क्रेग एर्व्हिन ( २), सीन विलियम्स ( १) व सिकंदर रजा ( ०) हे चार फलंदाज १९ धावांत माघारी परतले. माधेव्हेरे व मिल्टन शुम्बा यांनी झिम्बाबेसाठी लढत दिली. कागिसो रबाडाने टाकलेल्या ८व्या षटकात वेस्लीने १७ धावा कुटल्या आणि मिल्टनसह अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. वेस्लीने १८ चेंडूंत नाबाद ३५ धावा ( ४ चौकार व १ षटकार) आणि मिल्टनने १८ धावा केल्या.

6 / 9

प्रत्युत्तरात क्विंटन डी कॉकने पहिल्याच षटकात ४,४,४,६,४,१ अशा २३ धावा चोपून काढताना झिम्बाब्वेच्या चाहत्यांना गप्प केले. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पहिल्याच षटकातील या सर्वाधिक धावा ठरल्या आहेत. पहिल्या षटकानंतर पुन्हा पाऊस सुरू झाला अन् ५ मिनिटांत गेलाही. पण, आफ्रिकेसमोर ७ षटकांत ६४ झावांचे लक्ष्य ठेवले गेले. क्विंटनने फटकेबाजी सुरूच ठेवली आणि ४ चौकार खेचून दोन षटकांत ४० धावा चढवल्या.

7 / 9

या दोन षटकांत क्विंटनच्या ३९ धावा झाल्या आणि ट्वेंटी-२० पहिल्या दोन षटकांत सर्वाधिक ३३ धावांचा डेव्हिड वॉर्नरचा ( वि. वेस्ट इंडिज, २०१०) विक्रम मोडला गेला. क्विंटन व टेम्बा बवुमाने ३ षटकांत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली आणि त्यात क्विंटनच्या ४७ धावा होत्या. हा सामना रद्द झाल्याने आफ्रिका व झिम्बाब्वेला १-१ गुणावर समाधान मानावे लागले.

8 / 9

आजच्या निकालानंतर बांगलादेशने +०.४५०च्या नेट रन रेटने ग्रुप २ मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे आणि +०.०५० नेट रन रेट असलेल्या भारताला दुसऱ्या स्थानावर सरकावे लागले. आफ्रिका व झिम्बाब्वे प्रत्येकी १ गुणासह अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत.

9 / 9

आज आफ्रिकेने विजय मिळवला असता तर पाकिस्तानचे पुढील आव्हान खडतर झाले असले. त्यामुळे हा निकाल त्यांच्यासाठी दिलासा देणारा आहे. भारतालाही या निकालाने थोडासा आनंद मिळाला आहे आणि त्यांना उपांत्य फेरीत जाण्यासाठी चारपैकी ३ विजय मिळवणे पुरेसे आहेत. झिम्बाब्वे, बांगलादेश व नेदरलँड्स यांच्याविरुद्ध भारत विजय मिळवेल अशी खात्री आहे.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारत विरुद्ध पाकिस्तानझिम्बाब्वेद. आफ्रिकाबांगलादेश
Open in App