T20 world cup 2021, IND Vs PAK: Pakistanविरुद्धच्या दारुण पराभवामुळे Team Indiaचा सेमीफायनमधील प्रवेश धोक्यात? असं आहे पुढचं समीकरण

T20 world cup 2021, IND Vs PAK: टी-२० विश्वचषकात पाकिस्तानकडून झालेल्या दारुण पराभवामुळे भारतीय क्रिकेट संघाचे स्पर्धेतील गणित बिघडले आहे. या पराभवामुळे आता भारतीय संघाची उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठीची वाट खडतर झाली आहे.

टी-२० विश्वचषकात पाकिस्तानकडून झालेल्या दारुण पराभवामुळे भारतीय क्रिकेट संघाचे स्पर्धेतील गणित बिघडले आहे. या पराभवामुळे आता भारतीय संघाची उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठीची वाट खडतर झाली आहे. भारताचे स्पर्धेत अद्याप चार सामने बाकी आहेत. मात्र एका मोठ्या पराभावामुळे स्पर्धेतील उर्वरित सामन्यात भारतीय संघाला मोठ्या दबावाचा सामना करावा लागू शकतो, अशा परिस्थित जाणून घेऊया भारतीय संघासाठीच्या स्पर्धेतील पुढच्या समीकरणांबाबत.

टी-२० विश्वचषकामध्ये भारतीय संघाचा समावेश ग्रुप-२ मध्ये आहे. या गटात भारत आणि पाकिस्तानबरोबरच अफगाणिस्तान, न्यूझीलंड, स्कॉटलंड आणि नामिबियाचा समावेश आहे. या सहा टीमपैकी केवळ २ संघांनाच उपांत्य फेरीत प्रवेश मिळणार आहे. म्हणजेच उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी प्रत्येक संघाला किमान ४ ते ५ सामने जिंकावे लागतील. त्याशिवाय नेट रनरेटवरही अंतिम समीकरण ठरणार आहे.

भारताला आता आपला पुढील सामना पुढील सोमवारी न्यूझीलंडविरोधात खेळायचा आहे. त्यानंतर ३ नोव्हेंबर रोजी भारतीय संघाचा सामना अफगाणिस्तानशी होईल. त्यानंतर पहिल्या फेरीतून पात्र ठरलेले दोन संघ स्कॉटलंड आणि नामिबिया यांच्याशी भारताचा सामना होईल. भारतीय संघाला या दोन संघांविरोधात सहज विजय मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र अन्य दोन संघांविरोधात विजय मिळेलच याची हमी नाही आहे.

गटातून केवळ दोन संघच उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. म्हणजेच भारतीय संघाला उर्वरीत सामने जिंकावे लागतील. तसेच ते मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. या गटात अफगाणिस्तानसह चार मजबूत संघ आहेत. अशा परिस्थितीत दोन मोठ्या संघांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागण्याची शक्यता आहे.

सध्या या ग्रुप २ मध्ये पाकिस्तान २ गुणांसह अव्वलस्थानी आहे. तर १० विकेट्सनी पराभव झाल्याने भारतीय संघाचा नेट रनरेट मायनसमध्ये आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाला पुढच्या सामन्यांमध्ये केवळ विजय नाही तर सरस धावगतीसह विजय मिळवावा लागणार आहे. २०१६ च्या टी-२० विश्वचषकातही भारतीय संघाला न्यूझीलंडकडून दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र त्यानंतर भारतीय संघाने उपांत्य फेरीपर्यंत मुसंडी मारली होती.

Read in English