Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : पाकिस्तानवर ICCने केली कारवाई अन् टीम इंडियाला सापडला विजयाचा मार्ग, वाचा नेमकं काय घडलं

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : १४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतानाही भारतीय फलंदाजांना फार कष्ट घ्यावे लागले. पाकिस्तानचा पदार्पणवीर गोलंदाज नसीम शाहने कौतुकास्पद गोलंदाजी केली. पण, रवींद्र जडेजा व हार्दिक पांड्या या अनुभवी जोडीने डोकं शांत ठेवून भारताला विजय मिळवून दिला.

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : १४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतानाही भारतीय फलंदाजांना फार कष्ट घ्यावे लागले. पाकिस्तानचा पदार्पणवीर गोलंदाज नसीम शाहने कौतुकास्पद गोलंदाजी केली. पण, रवींद्र जडेजा व हार्दिक पांड्या या अनुभवी जोडीने डोकं शांत ठेवून भारताला विजय मिळवून दिला.

हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, अर्षदीप सिंग यांनी पाकिस्तानला हादरवून सोडले. भुवी व आवेश खान यांनी सुरुवातीला धक्के दिल्यानंतर हार्दिकने ३ विकेट्स घेत पाकिस्तानची मधली फळी विस्कळीत करून टाकली. अर्षदीप सिंग व आवेश खान यांनीही धक्के दिले. भुवनेश्वर कुरमाने २६ धावांत ४ विकेट्स घेतली आणि पाकिस्तानविरुद्ध ट्वेंटी-२० क्रिकेटमधील भारतीय गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.

बाबर आजम ( १०) अपयशी ठरल्यानंतर मोहम्मद रिझवान ( ४३) व इफ्तिखार अहमद ( २८) यांनी डाव सावरला. शाहनवाज दहानीने ६ चेंडूंत १६ धावा करून पाकिस्तानला १४७ धावांपर्यंत मजल मारून दिली. भुवीने या विकेटसह एका वर्षात पहिल्या सहा षटकांत सर्वाधिक १३ विकेट्स घेण्याच्या आशिष नेहराच्या ( २०१६) विक्रमाशी बरोबरी केली.

१९ वर्षीय गोलंदाज नसीम शाहने पदार्पणाच्या सामन्यात दमदार सुरुवात केली. पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर त्याने लोकेश राहुलला Golden Duck वर बाद केले. चौथ्या चेंडूवर विराट कोहलीचा स्लीपमध्ये झेल सुटल्याने भारताला दुसरा धक्का बसता बसता राहिला. विराट व रोहित शर्मा यांनी सावध खेळ करून स्वतःला सावरले. विराटची फटकेबाजी पाहता जुना विराट परत आला असेच सर्वांना वाटू लागले.

या दोघांनी भारताचा डाव सावरताना ७ षटकांत भारताला १ बाद ४१ धावा करून दिल्या. पण, पुढच्याच षटकात मोहम्मद नवाजच्या गोलंदाजीवर सलग दुसरा षटकार खेचण्याच्या प्रयत्नात रोहित ( १२) धावांवर झेलबाद झाला. पण, आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३४९९ धावांचा विक्रम त्याने स्वतःच्या नावावर केला. नवाजने त्याच्या पुढच्या षटकात विराटलाही बाद केले. विराट ३५ धावांवर बाद झाला. भारताच्या १० षटकांत ३ बाद ६२ धावा झाल्या होत्या.

रवींद्र जडेजाला पुढे फलंदाजीला पाठवण्यात आले आणि सूर्यकुमार यादवसह त्याने खिंड लढवण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानी गोलंदाज टिच्चून मारा करताना भारतीय फलंदाजांवरील दडपण वाढवताना दिसले. भारताला अखेरच्या ६ षटकांत ५९ धावा करायच्या होत्या, तेव्हा बाबर आजमन युवा गोलंदाज नसीम शाहला पुन्हा गोलंदाजीवर आणले. त्याने जडेजा व यादवची ३६ धावांची भागीदारी तोडताना यादवचा १८ धावांवर त्रिफळा उडवला.

भारताला विजयासाठी १८ चेंडूंत हव्या होत्या ३२ धावा... १०.६६च्या सरासरीने कराव्या लागणार होत्या धावा. षटकांची गती संथ ठेवल्याचा फटका पाकिस्तानलाही बसला अन् त्यांना शेवटच्या ३ षटकांत केवळ ४ खेळाडूंना ३० यार्डाच्या बाहेर ठेवावी लागली. नसीम शाहच्या पायाला दुखापत झाली होती, तो लंगडताना दिसला. तरी तो गोलंदाजी करत होता. नसीमच्या त्या षटकात जडेजाने ११ धावा काढल्या. भारताला १२ चेंडूंत २१ धावा हव्या होत्या.

हार्दिक पांड्याने १९व्या षटकात फटकेबाजी करताना पाकिस्तानच्या हातून सामना खेचून आणला. हार्दिकने ३ चौकार खेचून हॅरीस रौफच्या षटकात १४ धावा कुटल्या. अखेरच्या षटकात भारताला आता ७ धावा हव्या होत्या. मोहम्मद नवाजने २०व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जडेजाचा ( ३५ ) त्रिफळा उडवला. मॅच फिनिशर दिनेश कार्तिक मैदानावर आला. त्याने एक धाव घेत हार्दिकला स्ट्राईक दिली. ३ चेंडूत ६ धावा हव्या असताना हार्दिकने षटकार खेचून विजय पक्का केला. भारताने ५ विकेट्स राखून सामना जिंकला. हार्दिकने १७ चेंडूंत नाबाद ३३ धावा केल्या.

पाकिस्तानला अखेरच्या तीन षटकांत क्षेत्ररक्षणात बसलेल्या फटक्याचा हार्दिकने फायदा उचलला. षटकांची मर्यादा संथ राखल्याने पाकिस्तानला ३० यार्डाच्या आत ५ खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी उभे करावे लागले आणि त्यामुळे हार्दिकने फटकेबाजी मारून पाकिस्तानचे बारा वाजवले.