सुर्यकुमार बोलता बोलता बोलून गेला; '२-३ वर्षांपूर्वी काय स्थिती झाली होती'

सुर्यकुमारने आपल्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, यावर खंत व्यक्त केली.

न्यूझीलंडविरोधातील टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात ५१ चेंडूंत नाबाद १११ धावा कुटणाऱ्या सुर्यकुमार यादवने मनातील दु:ख बोलता बोलता बोलून दाखविले आहे. सुर्यकुमार तिसऱ्या नंबरवर आला होता. त्याने मैदानावर असे काही फटके लगावले की न्यूझीलंडचे गोलंदाजही हताश झाले. मॅचनंतरच्या पत्रकार परिषदेत सुर्यकुमारला कसोटी संघातील प्रवेशावर विचारण्यात आले.

सुर्यकुमारने आपल्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, यावर खंत व्यक्त केली. यातून सावरत त्याने म्हटले की, मी नेहमी आठवतो की २-३ वर्षांपूर्वी काय स्थिती झाली होती. त्यावेळी थोडी निराश नक्कीच झालो होतो. पण यातून काय चांगले काढता येईल याचा नेहमी विचार असायचा. मी एक चांगला क्रिकेटर कसा बनू शकतो? त्यावेळी मी केलेल्या गोष्टींचे फळ आता मला मिळत आहे. जेव्हा मी माझ्या खोलीत असतो किंवा माझ्या पत्नीसोबत प्रवास करतो तेव्हा मी अजूनही माझ्या भूतकाळाबद्दल बोलतो. तेव्हा आणि आता ते कसे बदलले आहे? यावर बोलतो, असे सुर्यकुमार म्हणाला.

'जे काही सकारात्मक आहे त्याकडे आपण नेहमी लक्ष दिले पाहिजे. त्यावेळी मी वेगवेगळे प्रयत्न केले. उदाहरणार्थ, चांगले खाणे, सराव सत्रात पुरेसा वेळ घालवणे, योग्य वेळी झोपणे. या सर्व गोष्टींचा लाभ मला आज मिळत आहे, असेही तो म्हणाला.

माझे काही शॉट्स मलाही आश्चर्यचकित करतात. मी खेळल्यानंतर माझ्या खोलीत परत जातो, तेव्हा सामना पुन्हा पाहतो. तेव्हा काही फटके पाहून मला आश्चर्य वाटते. माझी कामगिरी चांगली असो वा नसो, पण सामना मी नक्कीच पाहतो. मी कधीही खेळाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला नाही, ही एकच गोष्ट मी पाळली, असे सुर्यकुमार म्हणाला.

'मी शक्य तितके रूटीन फॉलो करतो. सामन्याच्या दिवशीही बदलत नाही. मी सामान्य दिवशी करत असलेल्या 99% गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. जिमला जायचे असते, तिथे जातो. वेळेवर दुपारचे जेवण करतो. यामुळेच मैदानात उतरल्यावर मला चांगले वाटते, असेही सुर्यकुमार म्हणाला.