KKR च्या एका निर्णयामुळे सुनील नरीननं IPL 2022ला सुरुवात होण्यापूर्वी रचला इतिहास; धोनी, विराट, रोहितच्या पंक्तित पटकावले स्थान

कोलकाता नाइट रायडर्सनं ( KKR) आयपीएल २०२२साठी सुनील नरीनला ( Sunil Narine) संघात कायम राखले आणि त्याला १०० कोटींची लॉटरी लागली

कोलकाता नाइट रायडर्सनं ( KKR) आयपीएल २०२२साठी सुनील नरीनला ( Sunil Narine) संघात कायम राखले आणि त्याला १०० कोटींची लॉटरी लागली. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये तो KKRकडून सलग ११ वे पर्व खेळणार आहे. आयपीएल इतिहासात १०० कोटी पगार घेणारा तो दुसरा परदेशी खेळाडू ठरला आहे.

KKRनं आयपीएल २०२१पर्यंत वेस्ट इंडिजच्या अष्टपैलू खेळाडूला ९५.२ कोटी पगार दिला आहे आणि आता त्यांनी पुढील पर्वासाठी ६ कोटी मोजून त्याला संघात कायम राखले आहे. KKRच्या या निर्णयामुळे सुनील नरीनचा आयपीएलमधील पगार हा १०० कोटींच्या वर जाणार आहे.

आयपीएलच्या १५ वर्षांच्या इतिहासात १०० कोटी पगार घेणारा तो एबी डिव्हिलियर्सनंतर दुसरा परदेशी खेळाडू ठरला आहे. त्यानं आयपीएलमध्ये १३४ सामन्यांत ९५४ धावा कुटल्या आहेत, तर १४३ विकेट्स घेतल्या आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक पगार घेणाऱ्या खेळाडूंचा विचार कराल तर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी, मुंबई इंडियन्सचा रोहित शर्मा, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा विराट कोहली, CSKचा माजी खेळाडू सुरेश रैना आणि RCBचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्स हे आघाडीवर आहेत.

आयपीएल २०२१पर्यंत धोनीनं १५२.८ कोटी पगार घेतला आहे. त्यानंतर रोहित शर्मा ( १४६.६ कोटी), विराट कोहली ( १४३.२ कोटी), सुरेश रैना ( ११०.७ कोटी) आणि एबी डिव्हिलियर्स ( १०२.५ कोटी) अशी क्रमवारी येते.