Sunil Gavaskar on Rohit Sharma, IND vs SL 3rd T20 : "असं सतत होत राहिलं तर हे अजिबात चालणार नाही"; सुनील गावसकरांनी कर्णधार रोहितला सुनावलं

'असं सतत घडणं हे टीम इंडियासाठी अजिबातच फायद्याचं नाही', असंही ते म्हणाले.

Sunil Gavaskar on Rohit Sharma, IND vs SL 3rd T20 : भारतीय संघाने (Team India) रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेला ३-० असा व्हाईटवॉश दिला. भारतीय संघाने दमदार कामगिरी करत विक्रमी विजय मिळवला.

श्रेयस अय्यरने तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत तब्बल २००हून अधिक धावा कुटल्या. त्याला सामनावीर किताबासह मालिकावीर म्हणूनही गौरविण्यात आलं. पण माजी क्रिकेटपटू सुनील गावसकरांनी मात्र मालिका जिंकल्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी मांडल्या.

"भारताने जरी मालिका ३-० ने जिंकली असली तरी ही गोष्ट काहीशी काळजी करण्यासारखी आणि विचार करण्यासारखीच आहे. असं सतत घडणं हे टीम इंडियासाठी अजिबातच फायद्याचं नाही", असं सुनील गावसकर म्हणाले.

"जर एखाद्या सामन्यात गोलंदाजांना शेवटच्या काही षटकांमध्ये मार पडत असेल तर तो खेळाचा स्वभाव समजून सोडून देता येऊ शकेल. पण मालिकेत शेवटच्या ५-६ षटकांत भारतीय गोलंदाजांना तब्बल ८०-९० धावा चोपण्यात आल्या", याकडे गावसकरांनी रोहितचं लक्ष वेधलं.

"बुमराहच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करणं तितकंसं सोपं नाहीये. पण कर्णधार शनाका आणि सलामीवीर निसांका यांनी बुमराहसारख्या वेगवान गोलंदाजालाही चोप दिला. अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही", असं गावसकर यांनी स्पष्टपणे सांगितलं.

"गोलंदाजीचा एक प्लॅन ठरवला जायला हवा. पहिल्या १० षटकात कोण गोलंदाजी करणार आणि शेवटच्या ८-१० षटकांत कोण व कशी गोलंदाजी करणार याबद्दल रोहित शर्माच्या टीम इंडियाला गांभीर्याने विचार करायलाच लागेल", अशी भूमिका सुनील गावसकर यांनी मांडली.