ऑटोग्राफ मागणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडले होते सुनील गावस्कर, कानपूरमध्ये तिच्या घरासमोर रोज मारायचे फेऱ्या!

भारतीय क्रिकेटपटू अन् त्यांची प्रेम प्रकरण, हे काही नवीन नाही. मन्सूर अली खान पतौडी, मोहम्मद अझरुद्दीन, विराट कोहली, सचिन तेंडुलकर, झहीर खान, वीरेंद्र सेहवाग आदी क्रिकेटपटूंच्या लव्ह स्टोरीबद्दल अनेकदा ऐकले अन् वाचलेही गेले आहे. पण, लिटल मास्टर सुनील गावस्कर यांच्या लव्ह स्टोरीचा किस्सा भन्नाट आहे.

मुंबईत १० जुलै १९४९मध्ये जन्मलेले सुनील गावस्कर वयाच्या ७२ व्या वर्षीही क्रिकेट जगतात सक्रिय आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करणारे ते पहिले फलंदाज आहे. ७ मार्च १९८७मध्ये त्यांनी पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात १० हजार धावा पूर्ण केल्या. या सामन्यात त्यांनी ६३ धावांची खेळी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३३ शतक झळकावणारेही ते पहिलेच फलंदाज. त्यांचा हा विक्रम सचिन तेंडुलकरनं मोडला.

क्रिकेटच्या मैदानावर विक्रमांचा पाऊस पाडणारे गावस्कर प्रेमाच्या सामन्यात पहिल्याच नजरेत क्लिन बोल्ड झाले. ऑटोग्राफ मागण्यासाठी आलेल्या मुलीच्या प्रेमात ते पडले अन् तिच्यासाठी कानपूरच्या गल्लींमध्येही फेऱ्या मारल्या. ते कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीच्या नाही, तर एका सामान्य कुटुंबातील मुलीच्या प्रेमात पडले. मार्शनील मल्होत्रा असे त्या मुलीचं नाव आणि ती कानपूरची राहणारी होती. तिचे वडील कानपूरात लेदरचा व्यावसाय करायचे.

१९७३साली गावस्कर आणि मार्शनील यांची पहिली भेट झाली. मार्शनील तेव्हा दिल्लीच्या श्रीराम कॉलेजमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण कत होती. क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी मार्शनील स्टेडियमवर पोहोचली अन् मॅच संपल्यानंतर ती गावस्कर यांच्याकडे ऑटोग्राफ मागण्यासाठी गेली. तेथेच गावस्कर बोल्ड झाले.

ऑटोग्राफ देताना गावस्कर मार्शनीलच्या सुंदरतेच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी मार्शनीलची माहिती घेण्यास सुरुवात केली आणि ती कानपूरची आहे असे त्यांना कळले. तेव्हा गावस्कर कानपूर येथे एका मित्राच्या घरी राहायला गेले आणि मार्शनीलच्या घरचा पत्ता माहीत पडल्यानंतर ते तिच्या घराभवती फेऱ्या मारू लागले.

मार्शनीलला गोष्टीची काहीच खबर नव्हती. कानपूर कसोटी दरम्यान गावस्कर यांनी मार्शनीलच्या संपूर्ण कुटुंबाला आमंत्रण दिले होते. सामना संपल्यानंतर गावस्कर यांनी मार्शनील हिला त्यांच्या मनातील गोष्ट सांगितली. मार्शनीलचे कुटुंबीयांनीही या नात्याला मंजूरी दिली. १३ सप्टेंबर १९७४मध्ये गावस्कर व मार्शनील यांचे लग्न झाले.

२० फेब्रुवारी १९७६मध्ये त्यांच्या घरी मुलाचा जन्म झाला. १९९९नंतर मार्शनील एक फाऊंडेशन चालवत आहेत आणि चॅम्प फाऊंडेशन क्रिकेट, टेबिल टेनिस, बॉक्सिंग, फुटबॉलसह अनेक खेळांतील खेळाडूंना मोटीव्हेट व प्रमोट करण्याचं काम करते.

गावस्कर यांनी १२५ कसोटी व १०८ वन डे सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले. १९७१मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यांनी कसोटीत १०, १२२ धावा केल्या आणि त्यात ३४ शतकं व ४५ अर्धशतकांचा समावेश आहे.

नाबाद २३६ ही त्यांची कसोटीतील सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. त्यांनी १०८ वन डेत ३,०९२ धावा केल्या असून त्यात १ शतक व २७ अर्धशतकांचा समावेश आहे. १९८७मध्ये त्यांनी निवृत्ती स्वीकारली.