गावसकरांनी 'वर्ल्ड कप'मध्ये केली होती मोठी चूक! संतापलेले प्रेक्षक घुसले होते मैदानात

'त्या' चुकीनंतर संघातील खेळाडूही सुनील गावसकरांशी बोलत नव्हते...

Sunil Gavaskar Team India ODI World Cup: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा आज ७४वा वाढदिवस. सुनील गावस्कर यांचा जन्म १० जुलै १९४९ रोजी मुंबईत झाला. क्रिकेट कारकिर्दीत त्यांनी लिटल मास्टर म्हणून नाव कमावले पण त्यांच्या एकदा त्यांच्या चुकीमुळे सुनील गावस्कर भारतीय चाहत्यांसाठी सर्वात मोठे खलनायक ठरले होते.

एका सामन्यादरम्यान सुनील गावसकर यांची ती चूक इतकी मोठी वाटली की ती पाहून भारतीय प्रेक्षक इतके संतापले होते की ते मैदानातच उतरले. पहिला वन डे विश्वचषक 1975 साली सुरु झाला. वन डे क्रिकेट तेव्हा नवीन होते आणि क्रिकेटपटू कसोटी खेळण्यासाठी ओळखले जात होते. त्यानंतर ६० षटकांचा वन डे सामना होऊ लागला.

पहिल्या वनडे विश्वचषकाचा पहिला सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सवर खेळला गेला. 7 जून 1975 रोजी हा सामना क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर खेळला गेला. त्यानंतर उन्हाळी हंगाम सुरू होता आणि प्रथम खेळताना इंग्लंडने 60 षटकांत चार गडी गमावून 334 धावांची मोठी धावसंख्या उभारली.

त्याकाळी ३०० पार धावसंख्या ही वन डे क्रिकेटमधील सर्वात मोठी धावसंख्या होती. इंग्लंडच्या डावात डेनिस एमिसने (१३७) शतकाचे आणि किथ फ्लेचरने (६८) अर्धशतकाचे योगदान दिले. यानंतर ख्रिस ओल्डने केवळ 30 चेंडूत शानदार अर्धशतक झळकावले. यानंतर भारताच्या फलंदाजीच्या वेळी सुनील गावसकरांकडून ती चूक घडली.

भारताचा या सामन्यात पराभव झाला असता तर पुढील फेरीच्या शक्यता कमी झाल्या असत्या. भारतीय डावाची सुरुवात करणारे सुनील गावस्कर त्यादिवशी आपल्या पद्धतीने खेळत होते. वन डे मध्ये ते कसोटी क्रिकेटसारखा खेळ करू लागले आणि भारतीय प्रेक्षक चिडले. प्रेक्षकांची नाराजी इतकी वाढली की त्यांच्यापैकी काही जण मैदानात धावत आले.

इतकेच नव्हे तर, पॅव्हेलियनमध्ये बसलेल्या भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावरही निराशा स्पष्ट दिसत होती. या डावात गावसकर १७४ चेंडू खेळून ३६ धावांवर नाबाद राहिले आणि भारताने 202 धावांनी सामना गमावला. त्यानंतर कोणताही सहकारी खेळाडू गावसकरांशी बराच वेळ काही बोललाही नव्हता. पण नंतर हळूहळू गावसकरांनी आपल्या खेळण्याच्या पद्धतीत सुधारणा केली आणि नंतर ते सर्वोत्तम फलंदाज म्हणून नावारूपास आले.