काव्या मारनला IPL पूर्वी 'हिरा' सापडला; पठ्ठ्याने ६० चेंडूंत २९२ धावा चोपून विक्रमांचा पाऊस पाडला

हैदराबादचा फलंदाज तन्मय अग्रवाल ( Tanmay Agarwal ) याने रणजी करंडक स्पर्धेच्या प्लेट गटात शुक्रवारी आरुणाचल प्रदेशविरुद्ध पहिल्या दिवशी १६० चेंडूंत नाबाद ३२३ धावांची वादळी खेळी केली. त्याच्या या खेळीने संघाला ४८ षटकांत ११.०२च्या सरासरीने ५२९ धावा उभारून दिल्या. तन्मय आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा सदस्य आहे.

दुसऱ्या दिवशी तन्मय अग्रवाल बाद झाला, परंतु त्याने १८१ चेंडूंत ३४ चौकार व २६ षटकारांसह ३६६ धावा चोपल्या. तन्मयने चौकार व षटकारांनी २९२ धावा जोडल्या आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली.

तन्मय अग्रवालने १४७ चेंडूत त्रिशतक पूर्ण केले आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे वेगवान त्रिशतक ठरले. त्याने २०१७ सामी मार्को मरैसने बॉर्डर संघाकडून खेळडाना इस्टर्न प्रोव्हिन्सविरुद्ध १९१ चेंडूंत त्रिशतक झळकावले होते.

तन्मयने १८३ मिनिटांत हे विक्रमी त्रिशतक झळकावले आणि ही दुसरे जलद तिहेरी शतक ठरले. यापूर्वी १९४८ मध्ये एमसीसीच्या डेनिस कॉम्पटन यांनी नॉर्थ ईस्ट त्रान्सव्हालविरुद्ध १८१ मिनिटांत ( २६१ चेंडू) तिहेरी शतक पूर्ण केले होते.

तन्मयने द्विशतक पूर्ण करण्यासाठी ११९ चेंडूं खेळले आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधील भारतीयाने झळकावलेले हे वेगवान द्विशतक ठरले. त्याने रवी शास्त्री यांचा १२३ चेंडूंचा ( वि. बडोदा, १९८५) विक्रम मोडला. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील तन्मयने दुसऱ्या वेगवान द्विशतकाची नोंद केली. शफिकुल्लाहने २०१८ मध्ये काबुल रिजनकडून खेळताना बूस्ट रिजनविरुद्ध ८९ चेंडूंत द्विशतक झळकावले होते.

तन्मयने पहिल्या दिवशी नाबाद ३२३ धावा केल्या आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका दिवसातील ही सातवी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. १९९४ मध्ये ब्रायन लाराने कौंटी अजिंक्यपद स्पर्धेत डरहॅमविरुद्ध शेवटच्या दिवशी ३९० धावा चोपल्या होत्या.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकाच दिवशी ३०० हून अधिक धावा करणारा तन्मय हा भारताचा पहिला फलंदाज ठरला. यापूर्वी वीरेंद्र सेहवागने ब्रेबॉर्न कसोटीत २००९ मध्ये श्रीलंकेविरु्ध एकाच दिवशी २८४ धावा चोपल्या होत्या.

तन्मयने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकाच इनिंग्जमध्ये सर्वाधिक २६ षटकारांचा विक्रम नावावर केला. यापूर्वी २०१५ मध्ये कॉलिन मुन्रोने सेंट्रल डिस्ट्रीक्ट संघाविरुद्धच्या २८१ धावांच्या खेळीत २३ षटकार खेचले होते.