"चहा प्यायला चला..." चक्क मराठीत बोलणारा हा पाकिस्तानी क्रिकेटपटू आहे तरी कोण?

महाराष्ट्रात मराठी अमराठी वाद बऱ्याचदा होत असतात. मराठी भाषेच्या आग्रहासाठी प्रादेशिक पक्ष ठाम असतात. त्यात इतर भाषिकांनी मराठीत बोलावे असं सगळ्यांना वाटते. परंतु एक पाकिस्तानी खेळाडू मराठीत बोलतोय हे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल ना...

भारत आणि पाकिस्तान यांच्यात कायम संघर्ष पाहायला मिळाला आहे. मग तो देशाच्या सीमेवर असो वा क्रिकेटच्या मैदानात...भारत पाकिस्तान यांच्यातील सामना हायव्हॉल्टेज असतो. आशिया कपमध्ये या दोन्ही संघांनी एकमेकांनी हातही मिळवले नव्हते त्यामुळे चर्चा झाली होती.

मात्र आता पाकिस्तानी क्रिकेटपटू चक्क मराठीत बोलत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत हा खेळाडू अस्खलित मराठी बोलताना दिसतो. हा खेळाडू आहे पाकिस्तानचा युवा गोलंदाज नसीम शाह

पाकिस्तानी खेळाडू सध्या आयएलटी २० लीगमध्ये खेळत आहेत. त्यात नसीम शाहला तिथे एक मराठी सहकारी भेटला. त्याच्याकडून नसीम शाहने मराठीचे धडे गिरवले. त्यानंतर नसीम शाहचा मराठी बोलतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावर नेटिझन्सनेही भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

चहा प्यायला चला असं म्हणत नसीम शाह त्याच्या सहकाऱ्यांना बोलावल असतो. त्यानंतर चहा प्यायल्यानंतरही त्याने मराठीत संवाद केला. आता मला बरं वाटतंय... असं नसीम शाह म्हणाला. त्याचा हा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आणि आता तो व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नसीम शाहला प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा तो म्हणाला की, याठिकाणी जगभरातील वेगवेगळे खेळाडू या लीगला खेळायला येतात. प्रत्येक देशाचे खेळाडू असतात. कुणी भारतातून, कुणी पाकिस्तानातून तर कुणी ऑस्टेलियातून सर्व देशातून खेळाडू इथं येऊन खेळतात. आम्ही फॅमिलीसारखे एक महिना इथे राहतो. त्यांच्याकडून काही शिकतो असं त्याने म्हटलं.

कोण आहे नसीम शाह? - नसीम शाहाचा जन्म १५ फेब्रुवारी २००३ साली पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्व्हा येथे झाला. पाकिस्तानातील युवा फास्ट बॉलर म्हणून तो ओळखला जातो. २०१८ साली नसीमने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये डेब्यू केला.

२०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमध्ये नसीम शाहने पदार्पण केले. त्यावेळी त्याचे वय फक्त १६ वर्ष होते. टेस्टमध्ये नसीमने २० सामने खेळले आहेत त्यात ६० विकेट्स घेतल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे.

टी-२० क्रिकेटमध्ये पाकिस्तानकडून नसीम शाहने अनेकदा सामने खेळले. त्याशिवाय विविध क्लब आणि फ्रेंचायसीसोबत तो खेळतो. त्याच्या खेळामुळे इतक्या लहान वयात त्याला अनुभवी आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली.

एप्रिल २०२५ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध एका वनडे सामन्यात नसीम शाह याने ४४ चेंडूंत ५१ धावा करत सगळ्यांना हैराण केले. ११ व्या क्रमावर येऊन सर्वात मोठा स्कोअर करणारा तो दुसरा गोलंदाज ठरला आहे.