रोहित शर्मानंतर हे दोघं असतील वन-डे संघाच्या कर्णधारपदाचे दावेदार; माजी क्रिकेटपटूने सांगितली नावं!

गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियाच्या कर्णधारपदावरून जोरदार चर्चा सुरू आहे.

गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियाच्या कर्णधारपदावरून जोरदार चर्चा सुरू आहे. २०२३च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर रोहित शर्मा कर्णधारपद सोडू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर टी-ट्वेंटीमध्ये हार्दिक पांड्याला पूर्णवेळ कर्णधार बनवले जाऊ शकते.

आता माजी भारतीय क्रिकेटर आकाश चोप्रा देखील भारतीय संघाच्या कर्णधारपदाशी संबंधित चर्चेत सामील झाला आहे. आकाश चोप्राने शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांना भविष्यात भारताच्या कर्णधारपदासाठी दावेदार असल्याचे सांगितले आहे.

आकाश चोप्रा एका स्पोर्ट्स शोमध्ये म्हणाला, 'मला वाटत नाही की सर्व फॉरमॅटसाठी एकच कर्णधार पाहण्याचे दिवस संपले आहेत. रोहित शर्मा कसोटी चॅम्पियनशिपपर्यंत कसोटी संघाचा कर्णधार असेल, यात बदल होणार नाही.

रोहित शर्मा यंदाच्या विश्वचषकापर्यंत वन-डे संघाच्या कर्णधारपदी कायम राहील, असं आकाश चोप्राने म्हटलं आहे. पण, भारतीय कर्णधारपदाच्या भवितव्याबद्दल बोलायचे झाले तर शुभमन गिल आणि ऋषभ पंत या बाबतीत आघाडीवर असतील.

हार्दिक पांड्या सध्या टी-२० फॉरमॅटमध्ये कर्णधार आहे आणि मला वाटते की तो यापुढेही कर्णधार राहील. तसेच आगामी ICC T20 विश्वचषक २०२४ मध्ये, तुम्हाला पांड्या भारतीय संघाचा कर्णधार म्हणून दिसेल.

चोप्रा म्हणाले, 'वन-डे विश्वचषकापर्यंत रोहित शर्मा वन-डे क्रिकेटचा कर्णधार राहील. पण मला वाटतं, भारताच्या कर्णधारपदाच्या बाबतीत ते शुभमन गिल आणि ऋषभ पंत असतील. भविष्यात भारताच्या कर्णधारपदासाठी हे माझे दोन उमेदवार आहेत, असं आकाश चोप्राने सांगितले.

शुभमन गिल सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत गिलने द्विशतकासह दोन वेळा शतके झळकावली. याआधी गिलने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतही शानदार खेळ दाखवला होता. गेल्या चार एकदिवसीय डावांमध्ये गिलने तीन वेळा तिहेरी अंक गाठले आहेत.

यष्टीरक्षक ऋषभ पंतबद्दल बोलायचे झाले तर तो सध्या क्रिकेटपासून दूर आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कार अपघातात जखमी झाल्यानंतर पंत रुग्णालयात आहे. पंत पुढील काही महिने मैदानात परतण्याची शक्यता नाही.