T20 World Cup : 'प्लेअर ऑफ द टुर्नामेंट'साठी ९ खेळाडूंची नावं जाहीर; इंग्लंड, पाकिस्तानचा दबदबा, भारताचे दोघं शर्यतीत

Shortlist for T20 World Cup 2022 Player of the Tournament revealed - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलपूर्वी आयसीसीने या स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी ९ खेळाडूंची नावं जाहीर केली. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात अंतिम फेरीचा सामना होणार आहे आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कारासाठी जाहीर केलेल्या यादीत या दोन संघाचां दबदबा दिसतोय. भारताचे दोन खेळाडू शर्यतीत आहेत, तर श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांचे प्रत्येकी एक खेळाडू टक्कर देणार आहेत.

शादाब खान ( Shadab Khan ) - पाकिस्तानच्या अष्टपैलू खेळाडूने उपांत्य फेरीच्या लढतीत न्यूझीलंडविरुद्ध चांगली कामगिरी केली. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्याही महत्त्वाच्या सामन्यात अर्धशतक झळकावले होते. सहा सामन्यांत त्याने १० विकेट्स घेतल्या आहेत.

शाहिन आफ्रिदी ( Shaheen Afridi ) - शाहिन आफ्रिदीने स्पर्धेची सुरुवात फार चांगली केली नाही, परंतु अखेरच्या काही सामन्यांत त्याने दमदार कमबॅक केले. त्याने पहिल्या दोन सामन्यांत एकही विकेट घेतली नव्हती, परंतु पुढील ४ सामन्यांत १० विकेट्स घेतल्या.

सॅम कुरन ( Sam Curran ) - इंग्लंडचा सॅम कुरन डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून चमकला आहे. पाच सामन्यांत त्यानेही १० विकेट्स घेतल्या आहेत. अफगाणिस्तानविरुद्ध त्याने पाच विकेट्स घेतल्या होत्या.

जोस बटलर ( Jos Buttler ) - इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर काय करू शकतो याची झलक भारतीयांनी पाहिली. भारताविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने ॲलेक्स हेल्ससह एकहाती विजय मिळवला. त्याने पाच सामन्यांत दोन अर्धशतकांसह १९९ धावा केल्या आहेत आणि यष्टींमागे ८ बळी टिपले आहेत.

ॲलेक्स हेल्स ( Alex Hales ) - जॉनी बेअरस्टोच्या दुखापतीमुळे ॲलेक्स हेल्सची वर्ल्ड कप स्पर्धेत एन्ट्री झाली आणि त्याने पाच सामन्यांत २११ धावा केल्या आहेत. भारताविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात त्याने नाबाद ८६ धावा चोपल्या.

सिकंदर रजा ( Sikandar Raza ) - झिम्बाब्वेच्या या खेळाडूने यंदा कमाल करून दाखवली. त्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर झिम्बाब्वेने अनपेक्षित निकालांची नोंद केली. त्याने ८ सामन्यांत २१९ धावा केल्या आहेत. पाकिस्तान विरुद्ध त्याे २५ धावांत ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या नावावर एकूण १० विकेट्स आहेत

वनिंदू हसरंगा ( Wanindu Hasaranga ) - श्रीलंकेच्या वनिंदू हसरंगाने पुन्हा एकदा गोलंदाजीत कमाल करून दाखवताना सर्वाधिक १५ विकेट्स घेतल्या आहेत. मागील वर्ल्ड कप स्पर्धेतही त्याने १६ विकेट्स घेतल्या होत्या.

विराट कोहली ( Virat Kohli) - यंदाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहलीने ९८.६६च्या सरासरीने सर्वाधिक २९६ धावा केल्या आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात विराटाने केलेली नाबाद ८२ धावांची खेळी ही संस्मरणीय ठरली. या स्पर्धेत त्याने चार अर्धशतकं झळकावली.

सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) - भारताच्या मधल्या फळीतील जबाबदारी सक्षमपणे सांभाळणाऱ्या सूर्यकुमार यादवने ही स्पर्धा गाजवली. त्याने ६ सामन्यांत २३९ धावा केल्या आहेत. त्याने नेदरलँड्स, दक्षिण आफ्रिका व झिम्बाब्वेविरुद्ध अर्धशतक झळकावले.