मी अजूनही पाकिस्तानसाठी खेळू शकतो, मला गेलचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडायचा आहे - मलिक

shoaib malik on 2024 world cup : पाकिस्तानचे माजी खेळाडू कर्णधार बाबर आझमसह आपल्या संघातील खेळाडूंना लक्ष्य करत आहेत.

भारतात सुरू असलेला वन डे विश्वचषक आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. यजमान भारत, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या चार संघांनी उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे.

बुधवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर उपांत्य फेरीचा सामना होईल. तर, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात फायनलच्या तिकिटासाठी लढत होणार आहे.

स्पर्धेचा प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला मात्र यंदा देखील काही खास कामगिरी करता आली नाही. शेजाऱ्यांना उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यात अपयश आल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे.

पाकिस्तानचे माजी खेळाडू कर्णधार बाबर आझमसह आपल्या संघातील खेळाडूंना लक्ष्य करत आहेत. यामध्ये शोएब मलिकचा देखील समावेश असून त्याने बाबरला भारतीय संघाकडून काहीतरी शिकण्याचा सल्ला दिला.

पाकिस्तानसाठी खेळण्यास अद्याप तयार असल्याचे शोएब मलिकने सांगितले. तसेच आगामी ट्वेंटी-२० विश्वचषक खेळून ख्रिस गेलचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडायचा असल्याचेही मलिकने नमूद केले.

एका कार्यक्रमात वसिम अक्रम आणि मिस्बाह-उल-हकशी बोलताना मलिकने म्हटले, "मी अद्याप क्रिकेट खेळत असून मेहनत घेत आहे. मला ख्रिस गेलचा विक्रम मोडायचा आहे, त्यासाठी अजून २००० धावांची गरज आहे."

"फिटनेसबाबत कोणतीही अडचण नाही, मी केवळ विश्वचषकासाठी क्रिकेट खेळत आहे. लोकांना वाटते की मी बाबर आझमच्या विरोधात आहे. तसे नाही बाबर आझम चांगला खेळाडू आहे", असेही शोएबने सांगितले.

खरं तर शोएबने कसोटी आणि वन डे आंतरराष्ट्रीयमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र, ट्वेंटी-२० मधून त्याने अद्याप निवृत्ती घेतलेली नाही.