Shaheen Afridi : शाहिद आफ्रिदीच्या जावयाने मोठा पराक्रम केला, PSL जेतेपद जिंकून Mumbai Indians च्या रोहित शर्माचा विक्रम मोडला

पाकिस्तान सुपर लीगच्या ( PSL 2022) अंतिम सामन्यात लाहोर कलंदर्स संघाने ( Lahore Qalandars) ४२ धावांनी मुलतान सुलतान ( MULTAN SULTANS) संघाचा पराभव करून जेतेपदाची माळ गळ्यात घातली.

पाकिस्तान सुपर लीगच्या ( PSL 2022) अंतिम सामन्यात लाहोर कलंदर्स संघाने ( Lahore Qalandars) ४२ धावांनी मुलतान सुलतान ( MULTAN SULTANS) संघाचा पराभव करून जेतेपदाची माळ गळ्यात घातली. कलंदर्सच्या ५ बाद १८० धावांचा पाठलाग करताना मुलतान संघ १३८ धावांवर गडगडला.

लाहोर कलंदर्स संघाचे हे PSLचे पहिलेच जेतेपद आहे आणि शाहिन शाह आफ्रिदीच्या ( Shaheen Afridi ) नेतृत्वाखाली या संघाने हा पराक्रम करून दाखवला. PSLमध्ये अपराजित असलेल्या मोहम्मद रिझवानच्या संघाला त्यांनी अंतिम फेरीत पराभवाची चव चाखण्यास भाग पाडले.

कलंदर्सचे आघाडीचे चार फलंदाज ७९ धावांवर माघारी परतले असताना अनुभवी मोहम्मद हाफिज आणि हॅरी ब्रूक यांनी दमदार खेळ केला. हाफिजने ४६ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह ६९ धावा केल्या, तर ब्रूकने २२ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ४१ धावांची खेळी केली. डेव्हिड विसेने ८ चेंडूंत २२ धावा कुटताना संघाला १८० धावांपर्यंत नेऊन पोहोचवले.

प्रत्युत्तरात मोहम्मद रिझवान ( १४) व शान मसूद ( १९) हे फॉर्मात असलेले खेळाडू आज अपयशी ठरले. टीम डेव्हिड ( २७) व खुशदील शाह ( ३२) यांनी संघर्ष दाखवला, परंतु कलंदर्सच्या गोलंदाजांसमोर त्यांचाही निभाव लागला नाही. शाहिन आफ्रिदीने ३, मोहम्मद हाफिज व झमान खान यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेत मुलतानचा संघ १९.३ षटकांत १३८ धावांवर माघारी पाठवला.

या कामगिरीसह फ्रँचायझी ट्वेंटी-२० लीगमध्ये सर्वात कमी वयात जेतेपद पटकावणाऱ्या कर्णधाराचा मान शाहिन आफ्रिदीने मिळवला. ( Youngest captain to win a franchise T20 league). शाहिनने २१ वर्ष व ३२७ दिवसांचा असताना हा पराक्रम केला आणि स्टीव्ह स्मिथ ( २२ वर्ष व २४१ दिवस) याचा २०१२ व रोहित शर्मा ( २६ वर्ष व २७ दिवस) याचा २०१३ सालचा विक्रम मोडला.