कुछ देर की खामोशी है...! २० महिन्यांपूर्वी वडिलांचे वाक्य अन् आज सर्फराज खानचे पदार्पण, प्रेरणादायी प्रवास

Sarfaraz Khan Journey : जून २०२२ मध्ये बंगळुरूच्या मैदानावर मुंबईचा संघ रणजी करंडक स्पर्धेची फायनल खेळायला उतरला होता, तेव्हा नौशाद खान म्हणाले होते, कुछ देर की खामोशी है, फिर शोर आयेगा, सर्फराज इंडिया जायेगा, मुंबई फायनल लायेगा...'' अन् आज २० महिन्यानंतर सर्फराज खानने IND vs ENG 3rd Test कसोटीत भारताकडून पदार्पण केले.

अनिल कुंबळे यांच्या हस्ते त्याला पदार्पणाची कॅप दिली गेली आणि बाजूलाच उभे असलेले त्याचे वडील नौशाद यांना अश्रू अनावर झाले.. कॅप घेऊन सर्फराज वडिलांकडे धावला आणि त्यांनी त्या कॅपला किस केले अन् लेकाला कडकडून मिठी मारली... राजकोटमध्ये आज वातावरण एकदम इमोशनल झाले होत..

सर्फराज खान हा उत्कृष्ट फलंदाजांची खाण असल्याचे म्हटले जाते. मुंबईच्या या खेळाडूने लहान वयातच आपली छाप सोडली. २००९ मध्ये १२ वर्षीय सर्फराजने हॅरिस शिल्ड ट्रॉफीत ४३९ धावांनी विक्रमी खेळी केली होती आणि तो स्टार बनला.

मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून सर्फराज खानवर वयाच्या चुकीच्या तथ्यांच्या आरोपावरून कारवाईही करण्यात आली होती. सर्फराजनेही या संकटावरही मात केली आणि सातत्यपूर्ण कामगिरीनंतर तो मुंबईच्या १९ वर्षांखालील संघापर्यंत पोहोचला आणि अखेरीस त्याने भारताच्या १९ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले. तेव्हापासून सर्फराजचा धावा करण्याचा सिलसिला कायम आहे.

खानचे वडील नौशाद खान हे स्वतः मुंबईचे प्रसिद्ध क्रिकेटपटू होते, त्यांनी लोकल सर्किटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली होती. पण ते रणजी ट्रॉफी किंवा टीम इंडियाच्या पातळीपर्यंत पोहोचू शकले नाही, म्हणून त्यांनी आपल्या मुलांद्वारे पुन्हा आपले स्वप्न पाहिले आणि मेहनत करण्यास सुरुवात केली. नौशाद खान यांनी सर्फराज खान आणि त्याचा धाकटा भाऊ मुशीर खान यांना प्रशिक्षण दिले.

नौशाद खान मुंबईत राहत असले तरी ते उत्तर प्रदेशातील आझमगडचे आहेत. हेच कारण आहे की जेव्हा सर्फराज मधल्या काळात मुंबईसाठी खेळू शकला नाही, तेव्हा त्याने एका मोसमात उत्तर प्रदेशकडून सामने खेळले.

नौशाद खान मुंबईत क्रिकेट अकादमी चालवतात, जिथून अनेक क्रिकेटपटू उदयास आले आहेत. त्यांच्या मुलांव्यतिरिक्त यामध्ये आयपीएलमध्ये चमकलेल्या कामरान खान, इक्बाल अब्दुल्ला यांच्यासारख्या नावांचाही समावेश आहे.

सर्फराजने आयपीएलमध्येही आपली ताकद दाखवली, वयाच्या १७ व्या वर्षी सर्फराज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला. आयपीएल सामन्यात सहभागी होणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला. तो दिल्ली कॅपिटल्सचा भाग आहे.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्फराजने दबदबा राखला आहे. त्याने ४५ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६९.८५ च्या सरासरीने ३९१२ धावा केल्या आहेत आणि त्यात १४ शतकं व ११ अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद ३०१ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने ३७ सामन्यांत ६२९ धावा आणि ट्वेंटी-२०त ९६ सामन्यांत ११८८ धावा केल्या आहेत.