Rohit Sharma vs Virat Kohli : विराट कोहली अन् रोहित शर्मा यांच्यातला वाद नाही नवा; कर्णधारपदापासून ते सोशल मीडियावरील फॉलोबॅक, अशा अनेक गोष्टींमुळे रंगलेली चर्चा

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. रोहित शर्माकडे वन डे कर्णधारपदाची व कसोटी संघाच्या उप कर्णधारपदाची जबाबदारी आली. विराटनं वन डे मालिकेतून माघार घेतली.

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताला रोहित शर्माच्या रुपानं नवीन कर्णधार मिळाला आहे. मागील ५-६ वर्षांपासून ही जबाबदारी पार पाडणाऱ्या विराट कोहलीकडे आता फक्त कसोटी संघाचे कर्णधारपद आहे. पण, BCCIच्या या निर्णयानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी अनेक घटना घडत आहेत.

रोहित शर्मानं दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून माघार घेतली, त्यापाठोपाठ विराट कोहलीनं वन डे मालिकेतून नाव मागे घेतले. दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी सराव सत्रात रोहितला दुखापत झाली आणि त्याला महत्त्वाच्या कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली. त्याच्या जागी प्रियांका पांचाळची निवड केली गेली आहे.

त्यानंतर सर्वांना धक्का देणारे वृत्त मंगळवारी समोर आले आणि ते म्हणजे वन डे संघाचे कर्णधारपद गमावलेल्या विराटनं आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेतून माघार घेतली. कुटुंबियांना वेळ देता यावा आणि मुलगी वामिकाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी विराटनं हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

वन डे कर्णधारपदावरून हटवण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयावर विराट कोहली नाराज झाला आहे. बीसीसीआयनं त्याला स्वतः हे पद सोडण्यासाठी ४८ तासांची मुदत दिल्याच्याही चर्चा आहेत. पण, विराटनं बीसीसीआयला कोणतेच उत्तर दिले नाही आणि बीसीसीआयनं त्याच्याकडून वन डे कर्णधारपद काढून घेण्याचा निर्णय घेतला.

विराट कोहली व रोहित शर्मा यांच्यातल्या वादाच्या चर्चा याआधीही अनेकदा रंगल्या. दोघांनी मीडियासमोर असे वाद नसल्याचे सांगितले असले तरी संघातील वातावरण काही वेगळंच सांगतंय. याच वर्षी सप्टेंबर महिन्यात विराटनं बीसीसीआयकडे विनंती करताना रोहितला उप कर्णधारपदावरून हटवण्याची मागणी केली होती.

रोहितच्या वयाचं कारण पुढे करून विराटनं ही मागणी केली होती. त्याला उप कर्णधारपदाची जबाबदारी युवा खेळाडूला द्यायची होती. पण, बीसीसीआयनं त्यावेळेस नकार दिला. आता तर नशिबानं अशी पलटी मारली की रोहित मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार झाला आहे आणि विराटला त्याच्या नेतृत्वाखाली खेळावे लागणार आहे.

२०१८मध्येही दोघांमध्ये वाद झाल्याची चर्चा होती. ही दोघं सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करत नसल्यावरून या दोघांमध्ये भांडण असल्याचा अंदाज लावला गेला. आता इंस्टाग्रामवर ही दोघं एकमेकांना फॉलो करत आहेत.

विराटची पत्नी अनुष्का शर्मा हिच्या एका पोस्टचा संबंध रोहित- विराट वादाशी लावला गेला. त्यात तिनं लिहिलं होतं की, बुद्धीमान व्यक्तीनं काहीच मत व्यक्त केलं नाही, सत्य हे असत्याच्या दिखाव्यामागे झाकोळून जात नाही.'