रोहित शर्माने निवडले कारकीर्दितील ५ अमूल्य क्षण! Mumbai Indiansच्या जेतेपदाला नाही स्थान

भारतीय संघातील सर्वोत्तम सलामीवीर रोहित शर्मा याने त्याच्या कारकीर्दितील पाच अमूल्य क्षण सांगितले आहेत. भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्यांमध्ये रोहित शर्माचा पाचवा क्रमांक लागतो. त्याने वन डे क्रिकेटमध्ये १० हजाराच्या आसपास धावा केल्या आहेत.

ट्वेंटी-२०त ३८५३ आणि कसोटीत ३६७७ धावा त्याच्या नावावर आहेत. २३ जून २००७ मध्ये त्याने भारतीय संघाकडून पदार्पण केले होते. आयसीसी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अर्धशतक झळकावून तो प्रथम चर्चेत आला होता आणि त्याने संघाला उपांत्य फेरीत पोहोचवले होते.

मागील १६ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दित रोहितने अनेक विक्रम नावावर नोंदवले आणि अनेक अविस्मरणीय क्षणांचा तो साक्षीदार-भागीदार राहिला आहे. वन डे क्रिकेटमध्ये तीन द्विशतक झळकावणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे.

शिवाय त्याने २०१३ पासून मुंबई इंडियन्ससह खेळताना पाच आयपीएल जेतेपदं पटकावली आहेत. पण, त्याला जेव्हा क्रिकेट कारकीर्दितील पाच अविस्मरणीय क्षण विचारले असता त्याने मुंबई इंडियन्सच्या जेतेपदाचा उल्लेखही नाही केला.

रोहित शर्मा २००७च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य होता आणि त्याने फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध १६ चेंडूंत ३० धावा चोपल्या होत्या. ६ नोव्हेंबर २०१३ मध्ये त्याने कसोटी पदार्पण केले आणि वेस्ट इंडिजविरुद्ध सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येताना त्याने १७७ धावा चोपल्या. त्यानंतर दुसऱ्या कसोटीतही ( वानखेडे) त्याने शतक झळकावले होते.

कोलकाता वन डेत श्रीलंकेविरुद्ध त्याने १७३ चेंडूंत ३३ चौकार व ९ षटकारांसह २६४ धाव कुटलेल्या आणि वन डे क्रिकेटमधील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली आणि आजही कायम आहे.

रोहितने २००७चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजय, कसोटी क्रिकेट पदार्पणात वेस्ट इंडिजविरुद्ध १७७ धावांची ( कोलकाता) खेळी, जानेवारी २०२१मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध गॅबा कसोटीतील ऐतिहासिक विजय, २००८च्या कॉमनवेल्थ बँक तिरंगी मालिकेत सचिन तेंडुलकर सोबत केलेल्या १२३ धावा आणि २०१४ मध्ये इडन गार्डनवर श्रीलंकेविरुद्ध २६४ धावा, या पाच अमूल्य क्षणांची निवड केली आहे.