Rohit Sharma Birthday: गरिबीत दिवस काढत होता रोहित शर्मा, एका व्यक्तीनं बदललं आयुष्य; 'हिटमॅन'च्या 'मसीहा'ची कहाणी...

Rohit Sharma Birthday: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा आज वाढदिवस आहे. रोहितशी निगडीत आजवर चाहत्यांना अनेक गोष्टी माहित असतील. पण त्याच्या आयुष्यात एका व्यक्तीचं खूप मोठं योगदान आहे.

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. रोहितच्या नावावर अनेक आंतरराष्ट्रीय विक्रमांची नोंद आहे. आक्रमक आणि बेधडक फलंदाजीच्या जोरावर रोहितनं आज कोट्यवधी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.

'आपला' रोहित आत ३५ वर्षांचा होतोय. प्रत्येक व्यक्तीच्या यशाच्या मार्गात अनेक व्यक्तींचं योगदान असतं. रोहितच्याही आजवरच्या प्रवासत अनेक व्यक्तींचं मोलाचं योगदान राहिलं आहे. पण त्यातही एका व्यक्तीचं खूप मोठं स्थान आहे. या व्यक्तीनं रोहितच्या शिक्षणाच्या खर्चासह त्याचं क्रिकेट करिअर देखील सांभाळलं.

रोहित शर्माचा जन्म नागपूरच्या एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. तर त्याचं पुढील आयुष्य मुंबईत गेलं. जिथं तो आपल्या आजी-आजोबा आणि काकांसोबत राहीला. मुंबईतच त्यानं क्रिकेट खेळायला सुरुवात केली.

प्रशिक्षक दिनेश लाड यांच्या मार्गदर्शनाखाली रोहितची फलंदाजी बहरत गेली. फलंदाजीत आणखी गुणवत्ता यावी यासाठी दिनेश लाड यांनी रोहितला स्वामी विवेकानंद कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याचा सल्ला दिला होता. पण रोहितकडे त्यावेळी पैसे नव्हते.

अशावेळी दिनेश लाड यांनी रोहितला स्कॉलरशीप मिळवून दिली. ज्यामुळे रोहितला एकही रुपया खर्च न करता तब्बल चार वर्ष स्वामी विवेकानंद कॉलेजमध्ये शिक्षण घेता आलं.

रोहित शर्माच्या क्रिकेट करिअरला याच ठिकाणाहून यशाचे पंख प्राप्त झाले. खरंतर त्यावेळी रोहित ऑफस्पिनर गोलंदाज म्हणून खेळत होता. पण दिनेश लाड यांना रोहितच्या फलंदाजीत एक वेगळीच चमक दिसली होती आणि त्यांनीच रोहितला थेट ओपनिंग करायला सांगितलं होतं.

रोहितच्या करिअरनं इथूनच टॉप गिअर पडकला आणि मग त्यानं मागं वळून पाहिलंच नाही. अवघ्या १७ वर्षांचा असताना रोहित मुंबईच्या संघासाठी खेळू लागला.

रोहितचं भाग्य खरंतर तेव्हा उजळलं जेव्हा महेंद्रसिंग धोनीनं त्याला भारतीय संघात ओपनिंग करायची संधी दिली. आतापर्यंत रोहितनं वनडे विश्वात तीन द्विशतकं ठोकली आहेत. तर रोहितनं मुंबई इंडियन्सच्या संघाला पाचवेळा चॅम्पियनशीप मिळवून दिली आहे.

रोहित शर्मा सध्या क्रिकेट करिअरच्या शिखरावर असून भारताच्या तिन्ही क्रिकेट प्रकारातील संघांचा तो कर्णधार आहे. आता रोहितच्या नेतृत्वाखाली आयसीसीची ट्रॉफी भारतीय संघानं जिंकावी अशी उत्सुकता सर्वांना आहे. भारतीय संघाचा 'हिटमॅन' रोहित शर्माला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!