Rohit Sharma on Mumbai Indians: "आम्ही IPL 2022 मध्ये वाईट खेळलो, पण..."; रोहित शर्माने केलं महत्त्वाचं विधान

रोहितचा मुंबई संघ यंदा गुणतालिकेत तळाशी होता.

Rohit Sharma on Mumbai Indians: IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी अतिशय खराब झाली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ १४ सामन्यांपैकी केवळ चारच सामने जिंकू शकला. त्यामुळे ते गुणतालिकेत ते तळाशी राहिले.

IPLच्या १५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सने एका हंगामात तब्बल १० सामने हरले. इतकेच नव्हे तर रोहित शर्मालाही यंदा फारशी चांगली कामगिरी करता आली नाही.

पण गेल्या हंगामातील आठवणी विसरून रोहित शर्माने आता IPL 2023 बद्दल मोठं आणि महत्त्वाचं विधान केलं. संघाची कामगिरी वाईट झाली असली तरी खेळाडूंबद्दलही रोहितने मत व्यक्त केले.

रोहित म्हणाला, "संघातील एकजूट मुंबई इंडियन्सला पुढील वर्षी दमदार पुनरागमन करण्यास नक्की मदत करेल असा मला विश्वास आहे. हा आमच्यासाठी एक अनपेक्षित हंगाम होता, परंतु आम्हाला यातून शिकायचे आहे आणि सकारात्मकपणे पुढील वाटचाल करायची आहे."

"वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर पुढील हंगामात मुंबई इंडियन्स संघात सामील होणार आहे. दुखापतीमुळे यंदाच्या संपूर्ण हंगामात तो उपलब्ध नव्हता. तसेच कठीण प्रसंगी संघातील खेळाडूंनी एकमेकांना चांगली साथ दिली हीदेखील चांगली बाब आहे", असे रोहित म्हणाला.

"मुंबई इंडियन्स आता पुढचा सीझन कसा खेळायचा आणि तयारी कशी करायची याकडे लक्ष देत आहे. वाईट कामगिरी झाली असली तरीही कोणीही मनाने हरल्याचं दिसलं नाही. त्यामुळेच आम्‍ही हंगामाचा शेवट गोड करून शकलो. पण पुढील हंगामात कामगिरी सुधारून ताकदीने परतणार आहोत", असा विश्वास रोहितने व्यक्त केला.