अनिल कुंबळे ते रिषभ पंत! दुखापतीनंतर मैदानात उतरणाऱ्या लढवय्या क्रिकेटर्सची गोष्ट

इथं एक नजर टाकुयात अशा लढवय्या क्रिकेटर्संवर जे गंभीर जखमी झाल्यावरही मैदानात उतरुन लढले

भारत-इंग्लंड यांच्यातील अँडरनस-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेतील मँचेस्टरच्या मैदानातील चौथ्या कसोटी सामन्यात पायाला फॅक्चर असताना पंत पुन्हा बॅटिंगसाठी मैदानात उतरला.

मोठ्या अपघातातून सावरून दमदार कमबॅक करणाऱ्या रिषभ पंतनं मँचेस्टरच्या मैदानात पुन्हा एकदा आपल्यातील लढवय्या बाणा दाखवून दिला आहे. पण तो काही पहिला क्रिकेटर नाही जो गंभीर दुखापतीनंतर देशासाठी खेळताना दिसला.

इथं एक नजर टाकुयात अशा लढवय्या क्रिकेटर्संवर जे गंभीर जखमी झाल्यावरही मैदानात उतरुन देशासाठी लढले.

भारताचा दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे यांना २००२ मध्ये अँटिग्वा येथील वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात मर्विन डिलनच्या बाउन्सरवर दुखापत झाली होती. जबड्याला मार लागल्यावर पट्टी बांधून मैदानात उतरताना अनिल कुंबळे यांनी सलग १४ षटके गोलंदाजी केली होती. यावेळी त्यांनी ब्रायन लाराची विकेटही घेतली होती.

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर ग्रॅमी स्मिथ याला २००९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीत मिशेल जॉन्सनच्या चेंडू लागला होता. हाताला गंभीर इजा झाल्यावर तो १० व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता.

२०१९ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पॅट कमिन्सचा एका आखुड टप्प्याच्या उसळत्या चेंडूवर धवनला अंगठ्याला दुखापत झाली होती. मैदानातच प्राथमिक उपचार घेतल्यावर धवनने ९३ धावांवरून आपली खेळी कायम ठेवताना ११७ धावांची खेळी केली होती. या सामन्यानंतर अंगठा फॅक्चर असल्यामुळे तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडला होता.

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटर गॅरी कर्स्टन २००३ मध्ये लाहोर येथील पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात शोएब अख्तरनं मारलेल्या बाउन्सरवर दुखापतग्रस्त झाले होते. नाकातून रक्तस्त्राव होत असताना त्यांनी मैदान सोडले. पण दुसऱ्या डावात संघ अडचणीत असताना या क्रिकेटरनं जखमी झाल्यावर चेहरा सुजलेला असताना ४६ धावांची खेळी केली होती.

२०१४ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील केपटाऊन कसोटी सामन्यात मायकेल क्लार्क हा वेगवान गोलंदाज मॉर्न मॉर्केलच्या चेंडूवर दुखापग्रस्त झाला होता. बाउन्सरच्या माऱ्यावर खांदा फॅक्चर असताना त्याने नाबाद १६१ धावांची खेळी केली होती. त्याच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने मालिका २-१ अशी जिंकली. पण त्यानंतर मायकल क्लार्क काही काळासाठी मैदानाबाहेर राहिला होता.

१९८९ मध्ये सचिन तेंडुलकरनं पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेतून पदार्पण केले. या कसोटी मालिकेत वकार युनिसच्या बाउन्सरवर तेंडुलकर दुखापतग्रस्त झाला होता. नाकातून रक्तस्ताव होत असताना मैदान न सोडता तेंडुलकरनं आपली इनिंग पुढेही चालू ठेवली होती.