Rishabh Pant: “रिषभ संधी वाया घालावतोय, त्याला विश्रांती द्या,” पंतवर माजी सिलेक्टरचा संताप

यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतची मालिकेतील निराशाजनक कामगिरी टीम इंडियाची डोकेदुखी ठरत आहे.

टीम इंडिया सध्या न्यूझीलंडमध्ये असून एकदिवसीय मालिका खेळत आहे. यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतची या मालिकेतील निराशाजनक कामगिरी टीम इंडियाची डोकेदुखी ठरत आहे. दरम्यान, आता माजी क्रिकेटपटू आणि माजी सिलेक्टर के. श्रीकांत यांनी रिषभ पंतला फटकारले आहे.

रिषभ पंत त्याला मिळालेली संधी वाया घालवत असल्याचे मत कृष्णमाचारी श्रीकांत यांनी व्यक्त केले आहे. गेल्या काही दिवसांपासून रिषभ पंतला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यानं टी २० सामन्यांमध्ये फेब्रुवारीमध्ये वेस्ट इंडिजविरोधात अखेरचं अर्धशतक झळकावलं होतं.

रिषभ पंतला आतापर्यंत अनेकदा संधी देण्यात आली आहे. २०२२ मध्ये टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांत तो २१ सामने केळला. यामध्ये त्याला केवळ दोन वेळ ३० ही धावसंख्या पार करता आली.

एकदिवसीय सामन्यांत रिषभनं या वर्षी ९ डावांमध्ये दोन अर्धशतकं आणि एक शतक ठोकलं. “तुम्ही त्याला विश्रांती देऊ शकता. त्याला थोडी वाट पाहण्यास सांगा. पुनरागमन कर आणि भारतासाठी खेळ. तुम्ही त्याला विश्रांती देण्यापूर्वी काही सामन्यांची वाट पाहत आहात की आणखी एक दोन सामन्यांनतर त्याला बाहेर पाहू इच्छिताय,” असं श्रीकांत म्हणाले.

पंतला मिळालेल्या संधीचा त्याने फायदा घेतला नाही. मी खूप निराश आहे, हे काय होत आहे?, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टी २० मालिकेत त्यानं १७ धावा केल्या. तर पहिल्या एकदिवसीय सामन्यात १५ धावा करून तो बाद झाला.

“तो संधी वाया घालवत आहे. जर तुम्ही अशा प्रकारच्या सामन्यांत चांगली कामगिरी करता, तर ते चांगलं ठरेल. विश्वचषक आता जवळ आलाय. अनेक जण म्हणतायत की रिषभ धावा करत नाहीये आणि हे आगीत तेल ओतण्याचंच काम करेल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.