IND vs AUS: मला सर बोलल्याने राग येतो, त्यामुळे माझ्या नावाने किंवा बापू म्हणून हाक मारा - रवींद्र जडेजा

ravindra jadeja: सध्या भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या यांच्यात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे.

सध्या भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

पहिल्या सामन्यात भारतीय फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांच्या शानदार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव झाला. त्यामुळे दिल्लीत होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात फिरकीपटू जड्डूच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी रवींद्र जडेजाचे एक विधान खूप चर्चेत आले आहे. मला जर कोणी 'सर जडेजा' बोलले तर ते आवडत नसल्याचे जडेजाने सांगितले आहे.

याशिवाय सर ऐवजी मला माझ्या नावाने अथवा बापू म्हणून हाक मारा असे आवाहन देखील रवींद्र जडेजाने केले. मोठ्या कालावधीनंतर भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या जडेजाने पहिल्या सामन्यात शानदार कामगिरी केली होती.

दुखापतीनंतर इंग्लंड दौऱ्यासाठी संघात परतत असताना जडेजाचे हे वक्तव्य आहे. त्यावेळी जडेजाने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हटले की, "लोकांनी मला माझ्या नावाने हाक मारावी. हे पुरेसे आहे. मला सर म्हणलेले आवडत नाही. लोकांना हवे असेल तर ते मला बापू म्हणू शकतात, हेच मला आवडते. मला सर-वर अजिबात आवडत नाही. खरं तर जेव्हा लोक मला सर म्हणतात, तेव्हा मी त्याकडे लक्ष देत नाही."

रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामम्यात चमकदार अष्टपैलू खेळी केली होती. नागपूर येथे झालेल्या सामन्यात जड्डूने एका अर्धशतकी खेळीसह 7 बळी घेतले होते.

त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. अशा स्थितीत जडेजा दुसऱ्या कसोटीत टीम इंडियासाठी महत्त्वाचा ठरेल कारण दिल्लीच्या खेळपट्टीवरही फिरकीपटूंना मदत मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे अश्विन आणि जडेजा यांचा पुन्हा एकदा सामना करणे कांगारूंसाठी आव्हानात्मक असणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत, इशान किशन, श्रेयस अय्यर, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सूर्यकुमार यादव.