भारत वर्ल्ड कप फायनल कसा हरला? BCCI च्या प्रश्नावर राहुल द्रविडनं दिलेल्या उत्तराची चर्चा

नुकत्याच पार पडलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत अपराजित राहून फायनलमध्ये पोहोचणारा भारत हा एकमेव संघ होता, परंतु ऑस्ट्रेलियाने जेतेपदाच्या लढतीत ६ विकेट्स राखून विजयाची नोंद केली. या पराभवाची रिव्ह्यू मिटिंग नुकतीच पार पडली आणि त्यावर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने उत्तर दिले.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना खेळून ११ दिवसांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. पण भारतीय चाहते अजूनही हा पराभव विसरू शकलेले नाहीत. पराभवानंतर बोर्डाने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांची बैठक घेतली. यावेळी दोघांना वर्ल्ड कप स्पर्धेतील पराभवाबाबत प्रश्न विचारण्यात आला.

नुकताच राहुल द्रविडचा करार वाढवण्यात आला आहे. द्रविडच्या कोचिंगवर संपूर्ण बोर्ड खूश आहे. करार वाढवण्याबाबत प्रशिक्षक म्हणाले की, टीम इंडियासोबतची माझी शेवटची दोन वर्षे खूप संस्मरणीय होती. या प्रवासात आम्ही यश आणि अपयश एकत्र पाहिले. या काळात संघातून मिळालेला पाठिंबा अप्रतिम होता. आम्ही ड्रेसिंग रुममध्ये तयार केलेल्या संघ संस्कृतीमुळे मी खूप खूश आहे. वाईट काळातही टिकून राहिलेली ही संस्कृती आहे.

द्रविड पुढे म्हणाला की, मी बीसीसीआय आणि अधिकाऱ्यांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि या काळात मला पाठिंबा दिला. माझ्या कामादरम्यान मी अनेकदा घरापासून दूर होतो. अशा परिस्थितीत माझ्या कुटुंबियांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो. यामागे त्यांचा मोठा हात आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही द्रविडचे कौतुक केले होते आणि ते म्हणाले होते की, त्याच्या नियुक्तीदरम्यान मी म्हटले होते की, मुख्य प्रशिक्षकाची भूमिका सांभाळण्यासाठी राहुल द्रविडपेक्षा चांगला कोणी नाही. अशा परिस्थितीत द्रविडने आपल्या कामाने स्वत:ला पुन्हा सिद्ध केले आहे. टीम इंडिया आता सर्व फॉरमॅटमध्ये एक महान संघ म्हणून प्रगती करत आहे. आणि आमचा संघ तिन्ही फॉरमॅटमध्ये दाखवत असलेल्या अप्रतिम कामगिरीवरून द्रविडचा रोडमॅप स्पष्टपणे दिसतो.

या बैठकीत बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि उपाध्यक्ष राजीव शुक्लाही उपस्थित होते. अशा परिस्थितीत जेव्हा द्रविडला टीम इंडियाच्या पराभवाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, नरेंद्र मोदी स्टेडियमच्या संथ खेळपट्टीमुळे संघ हरला. संघाला खेळपट्टीकडून अपेक्षित टर्न मिळू शकले नाही. तसे झाले असते तर संघाने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना कोंडीत पकडले असते.