टीम इंडिया 'कांगारूं'ची शिकार करणार, पण पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक होणार!

आशिया चषक विजेतेपदानंतर भारतीय संघ २२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ३ सामन्यांच्या वन डे मालिकेत ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर होणारी ही स्पर्धा भारतीय खेळाडूंना तयारीसाठी अंतिम संधी आहे. पण, त्याहीपेक्षा या मालिकेत ऑस्ट्रेलियाची शिकार करून पाकिस्तानला धक्का देण्याची आयती संधी टीम इंडियाकडे आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात २२, २४ आणि २७ सप्टेंबर असे ३ वन डे सामने होणार आहेत. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा कालच करण्यात आली. निवडलेल्या संघात रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांना पहिल्या दोन सामन्यांसाठी विश्रांती दिली गेली आहे.

लोकेश राहुल व इशान किशन या दोन यष्टिरक्षकांना वर्ल्ड कप संघात स्थान मिळाले. त्यात आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३ वन डे सामन्यांच्या मालिकेतही संजूला संधी दिलेली नाही. ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा आणि वॉशिंग्टन सुंदर या युवा खेळाडूंना पहिल्या दोन वन डे सामन्यात निवडले गेले आहे.

या मालिकेतून भारतीय संघाला आयसीसी वन डे क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान होण्याची संधी आहे. पाकिस्तानचा संघ सध्या नंबर १ संघ आहे, परंतु त्यांना आशिया चषक स्पर्धेत निराशाजनक कामगिरी केली होती. तेच दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत ३-२ असा ऑस्ट्रेलियाला पराभव पत्करावा लागला.

ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या ११३ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी ते भारताविरुद्ध ३ वन डे सामने खेळणार आहेत आणि या मालिकेत ३-० असा विजय मिळवल्यास ते पुन्हा नंबर १ स्थानावर पोहोचतील. ऑस्ट्रेलियाने पहिले दोन वन डे सामने जिंकल्यास ते लगेच अव्वल स्थानी पोहोचतील, पण तिसऱ्या वन डे सामन्यांतील निकाल त्यांना खाली खेचू शकतो.

भारतीय संघ ११५ गुणांसह ( ११४.६५९) दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी २-१ असा विजय मिळवल्यास ते अव्वल स्थानावर पोहोचतील. पाकिस्तानचे नंबर १ स्थान जाईल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशिया चषक उंचावला. पण, जर भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला, परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करला. तर पाकिस्तान नंबर १ स्थानावर कायम राहिल.