Qualifier 1, MI vs DC: इशान, सूर्यकुमारची फटकेबाजी अन् बुमराहचा भेदक मारा; MIच्या विजयाचे हायलाईट्स

मुंबई इंडियन्सचा संघ इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वातील अंतिम सामन्यात प्रवेश करणारा पहिला संघ ठऱला.

रोहित शर्मा, किरॉन पोलार्ड शून्यावर बाद होऊनही मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians)च्या अन्य फलंदाजांनी धमाकेदार खेळ करताना संघाला २०० धावांचा पल्ला गाठून दिला. या तगड्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals)चे फलंदाज दबावाखाली दिसले.

जसप्रीत बुमराह व ट्रेंट बोल्ट यांनी DCच्या फलंदाजांची तारांबळ उडवताना MIला अंतिम फेरीत प्रवेश करून दिला. मुंबई इंडियन्सनं सहाव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. याआधी २०१० वगळता मुंबई इंडियन्सनं २०१३, २०१५, २०१७ व २०१९मध्ये जेतेपद पटकावले.

क्विंटन डी'कॉकनं पहिल्याच षटकात १५ धावा चोपून मुंबईला दमदार सुरूवात करून दिली. पण, दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरनं दुसऱ्याच षटकात आर अश्विनला गोलंदाजीला आणले. त्यानं पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माला ( ०) पायचीत करून माघारी पाठवले.

सूर्यकुमार यादव व क्विंटन यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून MIची गाडी रुळावर आणली. क्विंटन डी'कॉक ४० धावांवर माघारी परतला. सूर्यकुमारनं ३८ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारासह ५१ धावा केल्या.किरॉन पोलार्डही ( ०) अश्विनचा सोपा शिकार ठरला. अश्विननं ४ षटकांत २९ धावांत तीन विकेट्स घेतल्या.

मुंबईला धक्के बसूनही त्यांच्या धावांचा वेग काही कमी झाला नाही. इशान किशन व हार्दिक पांड्या यांनी षटकारांची आतषबाजी करताना मुंबईला मोठा पल्ला गाठून दिला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ताबडतोड २३ चेंडूंत 60* धावा चोपल्या.

मुंबई इंडियन्सनं ५ बाद 200 धावा चोपल्या. हार्दिकनं १४ चेंडूंत ५ षटकारांसह नाबाद ३७ धावा केल्या, इशाननं ३० चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ५५ धावा केल्या.

मुंबईनं उभ्या केलेल्या तगड्या आव्हानाचा भार दिल्लीचे आघाडीचे फलंदाज पेलवू शकले नाही. ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच षटकात पृथ्वी शॉ व अजिंक्य रहाणे बाद झाले. त्यानंतर जसप्रीत बुमराहनं दुसऱ्या षटकात शिखऱ धवनला बाद केले. दिल्लीचे आघाडीचे तीनही फलंदाज भोपळाही फोडू शकले नाही.

कर्णधार श्रेयस अय्यरला ( १२) बाद करून बुमराहनं दिल्लीची अवस्था ४ बाद २० धावा अशी दयनीय केली. त्यानंतर कृणाल पांड्यानं DCच्या रिषभ पंतला ( ३) बाद करून त्यांची अवस्था ५ बाद ४१ अशी केली.

मार्कस स्टॉयनिस तंबू ठोकून बसला आणि त्यानं अर्धशतकी खेळी करताना अक्षर पटेलसह सहाव्या विकेटसाठी ५०+ धावा जोडल्या. स्टॉयनिस ६५ धावांवर माघारी परतला. अक्षर पटेलनं ४२ धावा केल्या.

या दोघांव्यतिरिक्त दिल्लीच्या फलंदाजांनी निराश केलं. बुमराहनं ४ षटकांत १ निर्धाव षटकासह १४ धावांत ४ विकेट्स घेतल्या. दिल्लीला २० षटकांत ८ बाद १४३ धावा करता आल्या. मुंबईनं ५७ धावांनी सामना जिंकला.