पृथ्वी शॉने मोडले अनेक विक्रम! २ देशांत, २ संघांसाठी द्विशतक झळकावणारा पहिला भारतीय

पृथ्वी शॉने ( Prithvi Shaw) काल लंडन वन डे कप स्पर्धेत डबल धमाका उडवून दिला.... वन डे कप स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यात हिट विकेट झालेल्या पृथ्वीने काल प्रतिस्पर्धी गोलंदाजांची विकेट काढली.

११ षटकार आणि २८ चौकारांची आतषबाजी करताना त्याने १५३ चेंडूंत २४४ धावांची खेळी केली. त्याच्या या डबल सेन्चुरीने अनेक विक्रम मोडले काही नवीन बनले...

इंग्लंडमध्ये लिस्ट ए क्रिकेटमध्ये आतापर्यंत बेन डकेटची नाबाद २२० धावांची खेळी ( इंग्लंड लायन्स वि. श्रीलंका ए, २०१६) ही दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी होती, परंतु काल पृथ्वीने २४४ धावा करून या स्थानावर जाऊन बसला. एलिस्टर कूरने २००२मध्ये सरेकडून खेळताना ग्लॅमोर्गनविरुद्ध २६८ धावा केल्या होत्या.

पृथ्वी शॉने २४४ धावा चोपून लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करणारा चौथा भारतीय ठरला. या विक्रमात नारायण जगदीसन ( २७७ वि. अरुणाचल प्रदेश), रोहित शर्मा ( २६४ वि. श्रीलंका) व शिखर धवन ( २४८ वि. दक्षिण आफ्रिका ए ) हे आघाडीवर आहेत आणि भारताबाहेरील लिस्ट एक क्रिकेटमधील सर्वोत्तम वैयक्तिक खेळीत पृथ्वी दुसऱ्या क्रमांकावर आहे. धवनने प्रटोरिया येथे २४८ धावा चोपल्या होत्या.

इंग्लंडमध्ये लिस्ट ए क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा पृथ्वी हा पहिला भारतीय ठरला आहे. सौरव गांगुलीने १९९९मध्ये श्रीलंकेविरुद्ध १८३ धावा केल्या होत्या. नॉर्थहॅम्पटनशायर क्लबकडून द्विशतक करणारा पृथ्वी पहिला फलंदाज आहे. वेन लॉर्किन्सने वॉर्विकशायरविरुद्ध १९८३ मध्ये नाबाद १७२ धावा केल्या होत्या.

दोन देशांत, दोन संघांकडून द्विशतक झळकावणारा पृथ्वी शॉ हा फलंदाज आहे. त्याने मुंबईकडून खेळताना पुद्दुचेरीविरुद्ध नाबाद २२७ धावा केल्या होत्या आणि काल नॉर्थहॅम्पटनशायरकडून द्विशतक झळकावले. १२९ चेंडूंत त्याने द्विशतक झळकावले आणि इशन किशन नंतर ( १२६ चेंडू) लिस्ट ए क्रिकेटमध्ये भारतीयाने केलेले दुसरे जलद द्विशतक ठरले.

पृथ्वी शॉने त्याच्या २४४ धावांच्या खेळीत २८ चौकार व ११ षटकार असे एकूण ३९ चेंडू सीमापार पाठवले. २००+ धावा करताना इतके चेंडू सीमापार पाठवणारा तो तिसरा फलंदाज ठरला. रोहितने श्रीलंकेविरुद्ध आणि अली ब्राऊने ग्लॅमोर्गनविरुद्द ४२ चेंडू सीमापार पाठवले होते. तर जगदीसनने ४० चेंडू सीमापार पाठवले.