Prithvi Shaw: "मी एक यादीच बनवलीय...", मॉडेलसोबतच्या वादानंतर पृथ्वी शॉने टीम इंडियाबाबत सोडलं मौन

Prithvi Shaw on team india: भारतीय संघाचा खेळाडू पृथ्वी शॉने अभिनेत्रीसोबतच्या वादानंतर अखेर मौन सोडले आहे.

पृथ्वी शॉने मारहाण केली असल्याचा आरोप करणारी मॉडेल सपना गिल सध्या चर्चेत आहे. जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट करून चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

याप्रकरणाला बराच काळ लोटल्यानंतर युवा खेळाडू पृथ्वी शॉने माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, पृथ्वीने मॉडेलसोबतच्या वादावर भाष्य करणे टाळले आणि भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे म्हटले.

तरुण वयात भारतीय संघात पदार्पण केल्यानंतर टीम इंडियात पुन्हा एकदा स्थान मिळवण्यासाठी पृथ्वी कसून मेहनत करत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी त्याचा संघात समावेश झाला होता, पण प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.

अलीकडेच पृथ्वी शॉ मुंबईतील एका मॉडेलसोबत वादात सापडला होता. मॉडेलने त्याच्यावर अनेक आरोप केले. या सर्व वादानंतर शॉने चाहत्यांसमोर येत प्रतिक्रिया दिली आहे.

पृथ्वी शॉने म्हटले आहे की, त्याच्यासाठी फक्त टीम इंडियात प्रवेश मिळवणे हे महत्त्वाचे आहे. पृथ्वी शॉने न्यूज 24 या वृत्तवाहिनीशी बोलताना विविध मुद्द्यावर भाष्य केले.

टीम इंडियासाठी खेळणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. या टीम इंडियासोबत मला काय साध्य करायचे आहे याची मी यादी तयार केली असून मी संधीची वाट पाहत आहे, असे त्याने सांगितले.

पृथ्वी शॉने आणखी म्हटले की, ट्वेंटी-20 मध्ये परतल्यानंतर मला खूप बरे वाटले. खेळाडूंना भेटलो, त्यांच्यासोबत प्रशिक्षण घेतले. मी मजा केली. होय, मला खेळण्याची संधी मिळाली नाही पण त्यापेक्षा पुनरागमन महत्त्वाचे आहे."

"कधी-कधी असे वाटत होते की एवढी मेहनत करूनही मी टीम इंडियामध्ये का नाही, पण कधीच मला वाटले नाही की उशीर झालेला आहे", असे पृथ्वीने भावनिक विधान केले.

भारतीय संघाने शेवटची ट्वेंटी-20 मालिका हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात न्यूझीलंडविरूद्ध खेळली. त्या मालिकेसाठी पृथ्वीचा संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही.

खरं तर खराब फॉर्ममुळे आणि बंदी घातलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे पृथ्वी शॉ दीर्घकाळ भारतीय संघाबाहेर राहिला. मात्र, त्यानंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफीमध्ये जबरदस्त कामगिरी करून तो संघात परतला.

पृथ्वीने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 363 आणि रणजी ट्रॉफीमध्ये 379 धावा केल्या होत्या. भारताच्या ट्वेंटी-20 संघात आताच्या घडीला सलामीवीर शुबमन गिलला स्थान देण्यात आले आहे.