"प्लीज, भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेट होऊ द्या", शाहिद आफ्रिदीने PM मोदींना घातली भावनिक साद

Shahid Afrid to PM Modi : आशिया चषक 2023 च्या आयोजनावरून भारतीय क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात वाद रंगला आहे.

आशिया चषक 2023 च्या आयोजनावरून भारतीय क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात वाद रंगला आहे. आयसीसीच्या नियोजित वेळापत्रकानुसार आगामी आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचे बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले आहे.

याशिवाय आशिया चषक तटस्थ ठिकाणी खेळवावा अशी मागणी देखील बीसीसीआय सचिव जय शाह यांनी केली होती. या मागणीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे तत्कालीन अध्यक्ष रमीझ राजा यांनी भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती.

तरीदेखील पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आशिया चषक पाकिस्तानातच आयोजित करण्यावर ठाम आहे. दरम्यान, पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे की, मोदींनी दोन्ही देशांत क्रिकेट होऊ द्यावे.

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने म्हटले, "भारताकडून पाकिस्तानमधील सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. पण अलीकडेच अनेक आंतरराष्ट्रीय संघांनी आमच्या देशाचा दौरा केला आहे. आम्हाला भारतातही सुरक्षेचा धोका होता. मात्र दोन्ही देशांच्या सरकारकडून परवानगी मिळाल्यास दौरा नक्कीच होईल."

याशिवाय शाहिद आफ्रिदीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करताना म्हटले की, मोदी साहेब कृपया दोन्ही देशांमध्ये क्रिकेट होऊ द्या.

"जर आपल्याला एखाद्याशी मैत्री करायची असेल आणि तो आपल्याशी बोलत नसेल तर आपण त्याबद्दल काय करू शकतो? बीसीसीआय हे एक मजबूत बोर्ड आहे यात शंका नाही. जेव्हा तुम्ही मजबूत असता तेव्हा तुमच्यावर अधिक जबाबदारी असते", असे आफ्रिदीने 'स्पोर्ट्स तक'शी बोलताना म्हटले.

तसेच बीसीसीआयने अधिक शत्रू बनवण्याचा प्रयत्न करू नये, कारण तुम्हाला मित्र बनवण्याची गरज आहे. अधिक मित्र बनवल्याने तुम्ही आणखी मजबूत व्हाल असेही आफ्रिदीने म्हटले.

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कमकुवत आहे का? आफ्रिदीने यावर बोलताना म्हटले, "पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कमकुवत आहे असे म्हणणार नाही, पण समोरून देखील प्रतिसाद आला पाहिजे. मला तुमच्याशी मैत्री करायची आहे, पण तुम्हाला माझ्याशी मैत्री करायची नसेल तर मी काय करू."

2005 मध्ये पाकिस्तानमध्ये झालेल्या मालिकेची आठवण करून देताना शाहिद आफ्रिदी म्हटले, त्यावेळी मोठ्या प्रमाणात माध्यमांचे प्रतिनिधी आले होते. ती एक अविस्मरणीय मालिका होती, ज्याचा सर्वांना आनंद घेतला.

2005 मध्ये पाकिस्तानमध्ये भज्जी (हरभजन सिंग), युवी (युवराज सिंग) आणि इतर खेळाडू बाहेर जाऊन काहीही खरेदी करायचे. ते रेस्टॉरंटमध्ये जायचे तेव्हा त्यांच्याकडून कुणी पैसे घेत नव्हते, हे दोन्ही देशातील वैशिष्ट्ये असल्याचे आफ्रिदीने अधिक सांगितले.