कोहली मॅच विनर, संघातून बाहेर काढण्याचा विचार करणंही चुकीचं; माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूनं सुनावलं

T20 World Cup 2021 मध्ये भारतीय संघाची कामगिरी चांगली राहिली नाही. तर दुसरीकडे विश्वचषक स्पर्धेनंतर विराटनं टी २० संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता.

T20 World Cup 2021 स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरोधातील सामने गमावल्यानंतर भारतीय संघाच्या सेमी फायनलमध्ये जाण्याच्या आशा जवळपास मावळल्या होत्या.

९ वर्षानंतर पहिल्यांदा भारतीय क्रिकेट संघ आयसीसीच्या कोणत्या स्पर्धेच्या सेमीफायनलपर्यंतही पोहोचू शकला नाही. दरम्यान, स्पर्धेतील पराभवानंतर अनेकांनी कर्णधार विराट कोहलीवर निशाणा साधला. या विश्वचषकानंतर विराट कोहली टी २० संघाचं कर्णधारपद सोडणार आहे. तर काही दिग्गज खेळाडूंनी विराटला संघात स्थान दिलं जाऊ नये असं म्हटलं होतं.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार युनिस खान याला विराट कोहलीबाबत प्रश्न विचारण्यात आला आला. यावेळी त्यानं विराट कोहलीवर टीका करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं.

"तुम्ही सांगावं की विराट कोहलीचं टी २० संघात स्थान का नाही. विराट कोहलीला संपूर्ण जग मानतं. पाकिस्तानमध्ये तुम्हाला विराट कोहलीसारखी मेहनत करावी लागेल असं सांगितलं जातं," असं युनिस म्हणाला.

"जर तुम्हाला फलंदाज बनायचं आहे तर विराटसारखं बना, टी २० विश्वचषकात चूक त्या लोकांकडून झाली ज्यांनी स्पर्धेपूर्वीच विराट कोहलीला कर्णधारपदावरून हटवण्याची गोष्ट केली होती. या सर्व गोष्टी स्पर्धेपूर्वी केल्या जात नाही. असं झालं तर त्याचा परिणाम संघावरही होतो," असं त्यानं नमूद केलं.

विराट कोहली एक मॅन विनर आहे आणि त्याला संघातून बाहेर काढण्याचा विचार करणंही चुकीचं आहे. विराट कोहली हा जिंकवून देणारा खेळाडू आहे. पाकिस्तानविरोधातील सामन्यातही तो एकटाच क्रीजवर लढला होता. त्यावेळी ना रोहितची बॅट चालली ना पंत, विराट एकटा मैदानावर उभा होता आणि त्यानं अर्धशतकही ठोकल्याचं त्यानं सांगितलं.

हा तोच विराट कोहली आहे ज्यानं ऑस्ट्रेलियामध्ये भारताला दोन टेस्ट सीरिज जिंकवून दिल्या. इंग्लंडमध्येही विराटनंच जिंकवलं. आज जर भारतीय संघ टी २० च्या सेमीफायनल मध्ये पोहोचला असता तर या गोष्टी झाल्या नसत्या. आजही अनेक लोक त्याच्याकडेच टी २० कर्णधारपद राहावं असं म्हणत असल्याचं युनिसनं स्पष्ट केलं.

३३ वर्षीय विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार आहे. विराटनं आतापर्यंत कर्णधारपदी भारतासाठी ६५ सामन्यांमध्ये ५६.११ च्या सरासरीनं ५६६७ धावा केल्या आहेत. यात २० खणखणीत शतकं आणि १७ अर्धशतकांचा समावेश आहे. विराट कोहली एकदिवसीय क्रिकेट विश्वात एमएस धोनीनंतर सर्वाधिक धावा करणारा भारताचा कर्णधार आहे.

कोहलीनं आतापर्यंत ९५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ७२.६५ च्या सरासरीनं ५४४९ धावा केल्या आहेत. यात २१ शतकं आणि २७ अर्धशतकं कोहलीनं ठोकली आहेत. दुसरीकडे ट्वेन्टी-२० विश्वात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अरोन फिंचनंतर सर्वाधिक धावा करणारा दुसरा कर्णधार आहे. कोहलीनं संघाचा कर्णधार म्हणून ४९ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये आतापर्यंत १५७० धावा केल्या आहेत.

आयसीसी स्पर्धांची जेव्हा वेळ येते तेव्हा कर्णधारपदाच्या बाबतीत विराट कोहली फ्लॉप ठरलेला दिसून आला आहे. २०१७ सालच्या चॅम्पियन्स करंडकाच्या फायनलमध्ये पाकिस्ताननं भारतीय संघावर १८० धावांनी मात दिली होती. या सामन्यात कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पाकिस्ताननं ५० षटकांमध्ये दमदार फलंदाजी करत ३३८ धावांचा डोंगर उभारला होता.

२०१९ च्या वर्ल्डकपमध्ये भारतानं पुन्हा एकदा दमदार कामगिरीची नोंद करत उपांत्य फेरीत धडक मारली होती. पण महत्त्वाच्या सामन्यात कर्णधार कोहली पुन्हा एकदा फ्लॉप ठरल्याचं दिसून आलं होतं. न्यूझीलंड विरुद्ध भारताचा उपांत्य फेरीत १८ धावांनी पराभव झाला होता.

कसोटी क्रिकेट विश्वात भारतीय संघाची अव्वल दर्जाची कामगिरी पाहता आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये कोहली स्पर्धेचे जेतेपद प्राप्त करेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण साउथॅम्प्टनमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा कोहली ब्रिगेड फ्लॉप ठरली आणि न्यूझीलंडनं ८ विकेट्सनं मात करत चॅम्पियनशीप जिंकली.