पाकिस्तान क्रिकेटमध्ये नाट्यमय घडामोडी; वर्ल्ड कपसाठी निवृत्त झालेल्या खेळाडूंची एन्ट्री

Mohammad Amir and Imad Wasim: मोहम्मद आमिर आणि इमाद वसीम यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी उपलब्ध असल्याचे म्हटले आहे.

आगामी काळात जूनमध्ये क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटचा अर्थात ट्वेंटी-२० विश्वचषक होणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या धरतीवर ही स्पर्धा खेळवली जाईल. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

पाकिस्तान सुपर लीगचा यंदाचा हंगाम संपताच बोर्डाने खेळाडूंची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. खरं तर आगामी विश्वचषकासाठी पाकिस्तानचे दोन असे खेळाडू उपलब्ध आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

पण, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी चर्चा केल्यानंतर इमाद वसीम आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर यांनी राजीनामा परत देणार असल्याचे म्हटले आहे. तसेच आगामी ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

इमाद वसीम म्हणाला की, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर मी माझ्या निवृत्तीच्या निर्णयावर पुनर्विचार केला.

"आयसीसी ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ पर्यंत होणाऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांसाठी मी पाकिस्तानसाठी उपलब्ध असेन. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल बोर्डातील सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानू इच्छितो", असेही इमादने सांगितले.

तर मोहम्मद आमिर म्हणाला की, पाकिस्तानसाठी खेळायचं अजूनही माझं स्वप्न आहे. हे जीवन आपल्याला अशा मुद्द्यांवर आणते जिथे कधीकधी आपल्याला आपल्या निर्णयांवर पुनर्विचार करावा लागतो. मी आणि पीसीबी यांच्यात काही सकारात्मक चर्चा झाली आहे.

तसेच मला आदरपूर्वक वाटले की, माझी गरज आहे आणि कुटुंबाशी चर्चा केल्यानंतरही मी पाकिस्तानसाठी खेळण्यास तयार आहे. मी आगामी ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी उपलब्ध आहे. मला सर्वकाही माझ्या देशासाठी करायचे आहे. हिरवी जर्सी घालणे आणि देशाची सेवा करणे ही माझी नेहमीच मोठी आकांक्षा राहिली आहे आणि राहील, असे आमिरने स्पष्ट केले.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन विविध बाबींवर प्रकाश टाकला. बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

फिक्सिंगमुळे अडचणीत सापडलेल्या मोहम्मद आमिरची पाकिस्तानी संघात एन्ट्री झाली असून यावर पीसीबी अध्यक्षांनी शिक्कामोर्तब केला. निवड समितीने हिरवा सिग्नल दिल्यास आमिर पाकिस्तानसाठी खेळू शकतो, असे नक्वी यांनी सांगितले.