पाकिस्तानने फसविले! इमर्जिंग आशिया कपमध्ये बाबर आझमच्या वयाचे खेळाडू उतरविले, सहा वरिष्ठ संघातले

India a vs Pakistan a emerging asia cup 2023 भारताच्या टीम अ ला काल इमर्जिंग आशिया कप फायनलमध्ये पाकिस्तानच्या अ टीमकडून पराभव पत्करावा लागला आहे. परंतू, पाकिस्तानने मोठी चिटिंग खेळल्याचा प्रकार समोर आला आहे.

भारताच्या टीम अ ला काल इमर्जिंग आशिया कप फायनलमध्ये पाकिस्तानच्या अ टीमकडून पराभव पत्करावा लागला आहे. परंतू, पाकिस्तानने मोठी चिटिंग खेळल्याचा प्रकार समोर आला आहे.

पाकिस्तानने बाबर आजमपेक्षाही जास्त वयाच्या खेळाडूला उदयोन्मुख संघात खेळविल्याचा आरोप होत आहे. हे एवढ्यावरच नाही तर सहा खेळाडू असे आहेत जे आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले आहेत व त्यांचे वय २३ वर्षांपेक्षा अधिक आहे.

पाकिस्तानी संघातील या सहा खेळाडूंच्या वयावरून आता सवाल उठू लागले आहेत. श्रीलंकेत खेळविण्यात आलेल्या इमर्जिंग आशिया कपला ज्युनिअर आशिया कपही म्हटले जाते. या स्पर्धेत २३ वर्षाखालील खेळाडूंना संधी दिली जाते.

बीसीसीआयने देखील २३ वर्षांखालील टीम निवडली होती. परंतू, पाकिस्तानने मोठी फसवणूक केली आहे. पाकिस्तान आणि बांग्लादेशच्या संघांनी ३० वर्षांपर्यंतच्या खेळाडूंना या स्पर्धेत खेळविले आहे.

भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात 71 चेंडूत 108 धावा करणारा तैयब ताहीर हा जास्त वयाचा खेळाडू आहे. २६ जुलै रोजी तैयब हा २६ वर्षांचा होणार आहे. त्याने पाकिस्तानच्या वरिष्ठ संघासाठी तीन टी-20 सामनेही खेळले आहेत.

पाकिस्तानचा मोहम्मद वसीम ज्युनियर हा भलेही 21 वर्षांचा असला तरी त्याला 2 कसोटी, 14 एकदिवसीय आणि 27 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव आहे.

वेगवान गोलंदाज शाहनवाज दहानी 2 एकदिवसीय आणि 11 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. तो 24 वर्षांचा आहे. ओमिर बिन यूसुफचे वयही २४ वर्षे आहे. त्याला आंतरराष्ट्रीय मॅच खेळण्याचा अनुभव नाहीय.

वनडेसाठी राष्ट्रीय संघात समाविष्ट झालेल्या कामरान गुलाम वयाच्या २७ व्या वर्षी उदयोन्मुख स्पर्धेत उतरला होता.

वेगवान गोलंदाज अमाद बटही आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याच्या वयाचा आहे. त्याला संधी मिळालेली नसली तरी त्याचे वय २८ आहे. पाकिस्तान राष्ट्रीय संघासाठी एक T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला वेगवान गोलंदाज अर्शद इक्बाल हा २२ वर्षांचा आहे.

पाकिस्तानकडून तीन आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला साहिबदाजा फरमानही कालच्या मॅचमध्ये खेळला आहे. त्याचे वय २७ वर्षे आहे.

भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावणाऱ्या श्याम अयुबने पाकिस्तानकडून 8 टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत. तो २१ वर्षांचा आहे.