Babar Azam: पाकिस्तानचे आता एकच 'लक्ष्य' भारतात होणारा विश्वचषक; बाबर आझमने सांगितली 'रणनिती'

Babar Azam comments on World Cup in India: पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमने भारतात होणाऱ्या विश्वचषकाबाबत मोठे विधान केले आहे.

पाकिस्तानात सध्या पाकिस्तान सुपर लीगचा (PSL) थरार रंगला आहे. अशातच पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमने भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकावर एक मोठे विधान केले आहे. खरं तर या वर्षाच्या अखेरीस भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे.

पाकिस्तानी संघाचे लक्ष्य फक्त भारतात होणाऱ्या विश्वचषकावर असल्याचे बाबर आझमने सांगितले आहे. तसेच आगामी विश्वचषकात पाकिस्तानी संघ शानदार कामगिरी करेल असा विश्वास पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने व्यक्त केला.

ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये भारतात 13 वा वन डे विश्वचषक आयोजित केला जाईल, ज्याचा अंतिम सामना 26 नोव्हेंबर रोजी होणार आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती, पण आता त्यांनी आपला निर्णय मागे घेतला असून विश्वचषक खेळण्यासाठी ते भारतात येणार असल्याचे दिसत आहे.

बाबर आझमने जियो न्यूजजी संवाद साधताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. "आम्ही भारतात होणाऱ्या विश्वचषकावर लक्ष केंद्रित करत असून स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू", असे बाबरने सांगितले.

तसेच मी मोहम्मद रिझवानसोबत टॉप ऑर्डरमध्ये धावा करण्याचा प्रयत्न करेन कारण आमची कॉम्बिनेशन खूप चांगली आहे. प्रत्येक डावात धावा करणे शक्य नसले तरी, आम्हाला केवळ एक-दोन फलंदाजांवर अवलंबून राहता येणार नाही असे बाबरने स्पष्ट केले.

खरं तर मागील वर्षीच्या ट्वेंटी-20 विश्वचषकात पाकिस्तानने साजेशी खेळी केली नव्हती. मात्र, तरीदेखील शेजाऱ्यांना अंतिम फेरी गाठण्यात यश मिळाले होते. पण अंतिम सामन्यात इंग्लिश संघाने पाकिस्तानचा पराभव करून विश्वचषक जिंकला.

पाकिस्तानी संघाने आतापासून विश्वचषकाच्या तयारीला सुरूवात केल्याचे दिसते आहे. कारण अलीकडेच संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानची रणनिती स्पष्ट केली होती. भारतीय खेळपट्टीवर खेळताना संघात चांगले फिरकीपटू असणे गरजेचे असल्याचे आफ्रिदीने म्हटले होते.

पाकिस्तानातील समा टीव्ही या वृत्तवाहिनीशी बोलताना आफ्रिदीने म्हटले, "भारतात जाण्यापूर्वी तुमच्याकडे 4-5 फिरकीपटू असले पाहिजेत, कारण भारतात फिरकीपटूंची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे. आमची बाकीची फलंदाजी सारखीच आहे, फक्त एकच बदल होऊ शकतो पण फिरकीपटूंची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे."

आपण आपला पाया जितका अधिक मजबूत करू तितके चांगले आहे. तसेच आताच्या घडीला पाकिस्तानी संघ एवढेच करू शकतो, असे शाहिद आफ्रिदीने सांगितले.