रचिन रविंद्रने मोडला सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड! पाकिस्तानविरुद्ध ७ मोठे विक्रम

ICC ODI World Cup Pak vs Nz Live : पाकिस्तानच्या गोलंदाजांनी बेक्कार धुलाई झालेली पाहायला मिळतेय. बंगळुरूच्या खेळपट्टीवर न्यूझीलंडच्या रचिन रवींद्र आणि केन विलियम्सन यांची बॅट चांगलीच तळपली आहे. पहिलाच वर्ल्ड कप खेळणाऱ्या रचिनने आज पुन्हा विक्रमी कामगिरी करताना सचिन तेंडुलकरनंतर मोठा मान मिळवला.

नाणेफेकीचा कौल बाजूने लागूनही पाकिस्तानने गोलंदाजीचा निर्णय घेतला अन् तो त्यांच्या अंगलट आला डेव्हॉन कॉनवे ( ३५) आणि रचिन रवींद्र यांनी पहिल्या विकेटसाठी ६८ धावा जोडल्या. कर्णधार केन विलियम्सन आणि रचिन यांनी पाकिस्तानी गोलंदाजांना रडकुंडीला आणले. या दोघांनी १३३वी धाव घेताच पाकिस्तानविरुद्ध वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडकडून ( कॉलीन ग्रँडहोम व जीमि निशॅम) कोणत्याही विकेटसाठी १३२ धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडला.

केन वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडकडून सर्वाधिक १०७६* धावांचा विक्रम नावावर केला. त्याने स्टीफन फ्लेमिंगचा ( १०७५) विक्रम मोडला. रचिनने ८९ चेंडूंत त्याचे या वर्ल्ड कपमधील तिसरे शतक झळकावले अन् सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला.

क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या एकाच पर्वात ३ किंवा त्यापेक्षा अधिक शतक झळकावणारा तो ८वा फलंदाज आहे आणि पदार्पणात असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला. रोहित शर्मा ( ५), कुमार संगकारा ( ४), क्विंटन डी कॉक ( ४), रचिन रवींद्र ( ३), मार्क वॉ ( ३), सौरव गांगुली ( ३), मॅथ्यू हेडन ( ३), डेव्हिड वॉर्नर ( ३) यांनी हा पराक्रम केलाय.

रचिन रवींद्रचे हे वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील तिसरे शतक आहे आणि असा पराक्रम करणारा तो पहिला फलंदाज आहे. तो अद्याप २३ वर्ष व ३५१ दिवसांचा आहे आणि इतक्या कमीवयात वर्ल्ड कपमध्ये तीन शतक करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड त्याने नावावर केला. सचिन तेंडुलकरने ( २२ वर्ष व ३१३ दिवस) पंचवीशीच्या आत २ शतकं झळकावली होती. ौ

न्यूझीलंडकडून वन डे वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक ३ शतकांचा विक्रमही रचिनने आज नावावर केला. ग्लेन टर्नर ( १९७५), मार्टीन गुप्तील ( २०१५) आणि केन विलियम्सन ( २०१९) यांना त्याने मागे टाकले.

केन आणि रचिन यांची १४२ चेंडूंत १८० धावांची भागीदारी संपुष्टात आली. केन ७९ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांच्या मदतीने ९५ धावांवर बाद झाला. पाठोपाठ रचिन रवींद्रही ९४ चेंडूंत १५ चौकार व १ षटकारांच्या सहाय्याने १०८ धावांवर बाद झाला.

वर्ल्ड कपच्या एकाच पर्वात ५०० प्लस धावा करणारा तो दुसरा युवा फलंदाज ठरला. त्याने २३ वर्ष व ३५१ दिवसांचा असताना हा पराक्रम केला, तर सचिन तेंडुलकरने २२ वर्ष व ३२४ दिवसांचा असताना हा पराक्र केला होता. रचिनने आज बाबर आजमला ( ४७४) मागे टाकले.