PAK vs ENG: तब्बल 17 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये इंग्लंडचा संघ दाखल; टी-20 मालिकेचा रंगणार थरार

इंग्लंडचा संघ 17 वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर पाकिस्तान दौऱ्यावर पोहचला आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यामध्ये 7 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा अखेर गुरुवारी संपुष्टात आली. इंग्लंडचा क्रिकेट संघ तब्बल 17 वर्षांनंतर पाकिस्तानच्या धरतीवर क्रिकेट खेळणार आहे. जिथे त्यांना यजमान पाकिस्तानविरूद्ध 7 सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. इंग्लंडचा संघ लंडनहून कराची येथे दाखल झाला आहे. संघाला विमानतळावरून हॉटेलपर्यंत नेण्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती.

इंग्लंडचा संघ मोठ्या कालावधीनंतर पाकिस्तानला येत असल्यामुळे कडेकोड सुरक्षा ठेवण्यात आली आहे. मालिकेतील सातही सामने कराची आणि लाहोर येथे होणार आहेत. 20 सप्टेंबरपासून सुरू होणारी ही मालिका टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची असणार आहे.

कराची आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर या मालिकेची तयारी पूर्ण झाली आहे. लक्षणीय बाब म्हणजे मालिकेतील सुरूवातीचे चार सामन्यांसाठी खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. 16 सप्टेंबरपासून इंग्लंडचा संघ सरावास सुरूवात करेल.

आशिया चषकात पाकिस्तानच्या संघाला फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानचा संघ स्पर्धेचा किताब जिंकेल असे वाटत होते. मात्र श्रीलंकेने अखेरच्या सलग दोन सामन्यात पाकिस्तानी संघाला धूळ चारून सहाव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले.

इंग्लंडचा टी-20 संघ - जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, ॲलेक्स हेल्स, हॅरी ब्रूक, सॅम कुरान, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड. तसेच इंग्लंडच्या संघात राखीव खेळाडू म्हणून लियाम डॉसन, रिचर्ड ग्लेसन आणि टायमल मिल्स यांना संधी मिळाली आहे.

इंग्लंडचा संघ दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कसोटी मालिका जिंकून इथपर्यंत पोहचला आहे. या टी-20 मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. मात्र विश्वचषकासाठी अद्याप पाकिस्तानच्या संघाची घोषणा झाली नाही. विश्वचषक पार पडल्यानंतर देखील इंग्लंडचा संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे.