एकेकाळी या स्टार्सनी गाजवलं IPL मैदान; आता कुठेत ते?

पॉल व्हॅथॅटी: डावखुरा स्फोटक फलंदाज... 2011मध्ये त्यानं किंग्ज इलेव्हन पंजाबकडून दमदार फटकेबाजी केली. त्यानं चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात 63 चेंडूंत नाबाद 120 धावांची खेळी करून सर्वांचे लक्ष वेधले. त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत त्यानं ( 483) सहावं स्थान पटकावलं. पण, त्यानंतर त्याच्या प्रगतीचा आलेख उतरता राहिला.

स्वप्नील आस्नोडकरः गोव्याच्या या फलंदाजानं शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सला 2008चे जेतेपद पटकावून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ग्रॅमी स्मिथसह सलामीला येताना त्यानं 9 सामन्यांत 34.55च्या सरासरीनं 311 धावा केल्या. पण, त्याला सातत्य राखता आले नाही.

कमरान खानः उत्तर प्रदेशमधील माऊ गावातील लाकुडतोड्याचा मुलगा. पण, त्यानं राजस्थान रॉयल्सकडून खेळताना आपली छाप पाडली. 2009च्या सत्रात त्यानं आपल्या गोलंदाजीच्या जोरावर भल्याभल्या फलंदाजांना चक्रावून टाकले. पण, त्याच्या गोलंदाजीवर आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर गोलंदाजीत सुधारणा करत कमबॅक केले, परंतु त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यानंतर तो आता सहार येथे ड्रायव्हरचं काम करत आहे.

मनप्रीत गोनीः पंजाबच्या या गोलंदाजानं चेन्नई सुपर किंग्सकडून 2008मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. त्यानं त्या मोसमात 17 विकेट्स घेत महेंद्रसिंग धोनीचं मन जिंकलं. त्याला भारतीय संघातही स्थान मिळाले. 2013मध्ये तो किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळला आणि कोलकाता नाइट रायडर्सकडून त्यानं 18 चेंडूंत 42 धावा चोपल्या. त्यानंतर त्यानं स्थानिक क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आणि यावर्षी त्यानं कॅनडा टी-20 लीगमध्ये पदार्पण केले.

मनवींदर बिस्लाः यष्टिरक्षक फलंदाज म्हणून त्यानं 2009मध्ये डेक्कन चार्जर्सकडून पदार्पण केले. त्यानं 2011ते 2014 या कालावधीत कोलकाताचे प्रतिनिधित्व केले. त्यानं 2012च्या अंतिम सामन्यात 48 चेंडूंत 89 धावांची वादळी खेळी केली होती. पण, त्यानंतर तो अनसोल्ड राहिला.

राहुल शर्माः डावखुऱ्या फिरकीपटूनं डेक्कन चार्जर्सकडून आयपीएलच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यानंतर तो पुणे वॉरियर्स इंडियाकडून खेळला. त्यानं पदार्पणातच महान फलंदाज सचिन तेंडुलकरला बाद केलं. 2011मध्ये त्यानं 13 विकेट्स घेतल्या. त्यानंतर त्यानं टीम इंडियाचं चार वन डे आणि दोन ट्वेंटी-20 सामन्यांतही प्रतिनिधित्व केलं. पण, रेव पार्टित पकडला गेल्यानंतर त्याची क्रिकेट कारकिर्द जवळपास संपुष्टातच आली.

सुदीप त्यागीः उत्तर प्रदेशच्या या जलदगती गोलंदाजानं 2009मध्ये पदार्पणात 10 विकेट्स घेतल्या. पण, त्याला सातत्य राखता आले नाही.