कमी वयात लग्न, आयुष्यातील मोठी चूक! संसार मोडल्यावर CSK च्या स्टार क्रिकेटरची भावूक पोस्ट

वयाच्या २२ व्या वर्षी लाँगटाइम गर्लफ्रेंडसोबत उरकलं होत लग्न, आता दोघांचे मार्ग झाले वेगळे

भारतीय संघाचा लेगस्पिनर राहुल चाहर याने आपल्या वैवाहिक आयुष्याबाबत मोठी घोषणा करत पत्नी इशानी जोहर हिच्यासोबत थाटलेला संसार मोडल्याची गोष्ट शेअर केली आहे.

२०२२ मध्ये गोव्यात मोठ्या थाटामाटात विवाहबद्ध झालेल्या या जोडप्याने जवळपास चार वर्षांनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

वयाच्या २० व्या वर्षी क्रिकेटर राहुल चाहर याने इशानीसोबत साखरपुडा उरकला होता. त्याआधी ५-७ वर्षांपासून ते एकमेकांचे चांगले मित्र होते. मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. साखरपुड्यानंतर दोन वर्षांत त्यांनी लग्नही उरकलं. पण आता चौथ्या वर्षी दोघांचे मार्ग वेगळे झाले आहेत.

इशानीसोबतचं नात तुटल्याची गोष्ट शेअर करताना क्रिकेटरनं नात्याबद्दलच्या आपल्या मनातील भावनाही मनमोकळे पणानं व्यक्त केल्या आहेत. कमी वयात घेतलेला निर्णय अनपेक्षित धडे देणारा होता, असा उल्लेख राहुलनं आपल्या पोस्टमध्ये केला आहे.

राहुलने आपल्या पोस्टमध्ये कबूल केले की, स्वतःची किंमत आणि आयुष्यात खऱ्या अर्थानं काय करायचं आहे याची समज येण्याआधी आयुष्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. लग्नानंतरची वर्षे खूप काही शिकवून गेली.

तिच्याबद्दल मनात राग आहे ना कटुता! हे स्पष्ट करत क्रिकेटरनं मनातील भावना व्यक्त करताना म्हटलंय की, प्रत्येक नातं कायम टिकण्यासाठी नसतं; काही नाती आपल्याला जागं करण्यासाठी आणि शिकवण्यासाठी असतात.

लाँगटाइम गर्लफ्रेंडसोबतचा प्रेमाचा डाव अर्ध्यावर मोडल्यावर हा क्रिकेटर आपल्या करिअरवर फोकस करत आयुष्याची गाडी सकारात्मकरित्या ट्रॅकवर आणण्यास प्रयत्नशील असेल.

आयुष्यातून एखादी व्यक्ती गेली म्हणजे सगळं संपते असे नाही. हीच गोष्ट लक्षात घेत हा क्रिकेटर नव्या इनिंगसाठी उत्सुक असल्याचे त्याच्या पोस्टमधून दिसून येते.

IPL मध्ये पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्ससारख्या फ्रँचायझीकडून खेळणारा राहुल चाहर याला २०२१ पासून भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. पण यंदाच्या वर्षी तो भावाने ज्या संघातून खेळताना खास छाप सोडली त्या CSK च्या ताफ्यातून मैदानात उतरणार आहे.

राहुल चाहर हा स्टायलिश क्रिकेटरपैकी एक आहे. IPL च्या मिनी लिलावात पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिलेल्या राहुल चाहरसाठी CSK च्या संघाने ५.२० कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतले होते.