सौरव गांगुलीने खडेबोल सुनावल्यानंतर BCCI कडून आले उत्तर; अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर सुरू झालेलं राजकारण!

BCCI Elections : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI ) अध्यक्षपद तीन वर्ष यशस्वीपणे सांभाळल्यानंतर सौरव गांगुलीची ( Sourav Ganguly) या पदावरून उचलबांगडी झाली.

BCCI Elections : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI ) अध्यक्षपद तीन वर्ष यशस्वीपणे सांभाळल्यानंतर सौरव गांगुलीची ( Sourav Ganguly) या पदावरून उचलबांगडी झाली. १९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य रॉजर बिन्नी आता नवे अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहेत. येत्या १८ तारखेला होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याची औपचारिक घोषणा होईल. पण, गांगुलीला हटवल्यावरून राजकारण तापलं आहे.

तृणमुल काँग्रेसने ( TMC) सौरव गांगुलीने भाजपात प्रवेश नाकारल्यामुळे त्याला BCCI च्या अध्यक्षपदावरून बाजूला केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपाकडून पश्चिम बंगालच्या स्टार खेळाडूचा राजकीय बळी दिल्याचाही आरोप केला जातोय.

गांगुलीला इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL) चेअरमनपदाची ऑफर दिली होती, परंतु माजी कर्णधाराने ती स्वीकारण्यास नकार दिली. ''सौरव गांगुलीला आयपीएल चेअरमनपदाची ऑफर दिली होती, परंतु त्याने नम्रपणे ती नाकारली. बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषविल्यानंतर त्याखालील आयपीएल चेअरमनपद स्वीकारू शकत नाही, असे त्यामागचे त्याचे लॉजिक होते. त्याने बीसीसीआय अध्यक्षपदावर कायम राहण्याची इच्छा व्यक्त केली,''असे बीसीसाआयच्या सूत्रांनी PTI ला सांगितले होते.

The Telegraph ने दिलेल्या वृत्तानुसार सौरव गांगुलीच्या विकेटमागे आयसीसी व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांचा यामागे हात असल्याचे समोर येतेय... एन श्रीनिवासन हे चेन्नई सुपर किंग्स फ्रँचायझीचे मालकही आहेत. टेलेग्राफने दिलेल्या वृत्तानुसार एन श्रीनिवासन यांनी गांगुलीविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आणि त्याचा कार्यकाळ असा असक्षम होता, हे सर्वांना पटवून दिले. त्यात श्रीनिवासन यांना केंद्रीय मंत्र्याची साथ मिळाल्याचाही दावा टेलेग्राफने केलाय.

इतके दिवस या सर्व चर्चांवर गप्प बसलेल्या गांगुलीनेही काल आपले मत मांडले. ‘आपण नेहमी प्रशासकपदी कायम राहू शकत नाही. आता दुसरे काहीतरी करण्याची वेळ आली आहे. मी यापेक्षा वेगळे काहीतरी करेन,’ असे सूचक उद्गार त्याने काढले.

तो पुढे म्हणाला, आयुष्यात चढ-उतार येत राहतात. या काळात स्वत:वर विश्वास ठेवणे सर्वांत महत्त्वाचे असते. मोठे काहीतरी करण्यासाठी आपण प्रत्येकजण छोटी छोटी पावले उचलतो. हे प्रयत्न दिवसेंदिवस करत राहावे लागतील. सर्वकाही पटकन मिळवायचे असेल तर ते शक्य नाही. तुम्ही एका दिवसात सचिन तेंडुलकर किंवा नरेंद्र मोदी बनू शकत नाही.

गांगुलीच्या या प्रतिक्रियेनंतर बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी त्यांचे मत मांडले. अरुण धुमाळ यांच्याकडे आयपीएल चेअरमनपदाची जबाबदारी जाण्याची शक्यता आहे. ते म्हणाले, बीसीसीआयचे अध्यक्षपद तीन वर्षांपेक्षा जास्त कोणीच भूषविलेले नाही. त्यामुले गांगुलीच्या विरोधात काही सदस्य होते, अशा बातम्या आहेत, त्या तथ्यहिन आहेत. त्याच्याविरोधात कोणीच बोललेलं नाही. मागील तीन वर्षांत कोरोना काळात ज्या पद्धतीने गांगुलीच्या नेतृत्वाखाली BCCI ने काम केले, त्यावर सर्व सदस्य आनंदी व समाधानी आहेत. रॉजर बिन्नी व नवीन सदस्य अर्ज भरत असताना दादा त्यांच्यासोबत होता. प्रत्येक निर्णय चर्चा करून घेतला गेला आणि दादाही त्याचे मत मांडत होता.