९ तासांची झोप, पोहणे, योगा अन्... ! रोहित, विराटसह खेळडूंसाठी 'फिटनेस' प्रोग्राम, पालन न केल्यास...

भारतीय क्रिकेट संघ आशिया चषक स्पर्धेपूर्वी गुरूवारपासून बंगळुरू येथील अलूर येथे शिबिरासाठी एकत्र येणार आहे. तेव्हा संघातील अव्वल खेळाडूंना १३ दिवसांचा फिटनेस प्रोग्राम देण्यात आला होता.

अलूर येथे त्यांची रक्तासह संपूर्ण शरीर चाचणी केली जाईल. प्रशिक्षक त्यांच्या फिटनेसची चाचणी घेतील आणि जे मानके पूर्ण करत नाहीत त्यांना तंदुरूस्तीवर काम करावे लागेल.

वेस्ट इंडिज दौऱ्यावरून परतलेल्या आणि आयर्लंडविरुद्ध सुरू असलेल्या ३ सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत न खेळणाऱ्या खेळाडूंना १३ दिवसांच्या कार्यक्रमाचे पालन करण्यास सांगण्यात आले होते. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, अष्टपैलू हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे.

९ ते २२ ऑगस्ट दरम्यान फिटनेस प्रोग्राम दोन भागात विभागला गेला होता. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी प्रत्येक खेळाडूला शक्य तितक्या चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी, हा प्रोग्राम तयार केला गेला होता. भारताच्या मोहिमेला खीळ बसू शकणार्‍या दुखापतीपासून वाचवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलले गेले आहे.

शिबिरापूर्वी खेळाडूंच्या फिटनेसचे मूल्यांकन करण्यासाठी हा कार्यक्रम राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) ने फिजिओथेरपिस्ट आणि प्रशिक्षकांशी सल्लामसलत करून तयार केला होता. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार प्रत्येक खेळाडूला एक विशिष्ट प्रशिक्षण आणि आहार कार्यक्रम देण्यात आला होता, ज्याचे त्यांना काटेकोरपणे पालन करावे लागले.

“खेळाडूंसाठी हा एक खास कार्यक्रम आहे, कारण आम्हाला ते पुढील दोन महिन्यांसाठी तंदुरुस्त हवे आहेत. कोणी प्रोग्राम फॉलो केला आणि कोणी नाही हे ट्रेनरला कळेल. त्यानंतर संघ व्यवस्थापन निर्णय घेईल की ज्या खेळाडूंनी त्यांच्या कार्यक्रमाचे पालन केले नाही, त्यांचे काय करावे, ” असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

गेल्या काही वर्षांपासून दुखापती हा भारतीय संघासाठी चिंतेचा विषय आहे. प्रत्येक मोठ्या स्पर्धेपूर्वी त्यांना किमान एक मोठा धक्का बसला आहे. जसप्रीत बुमराह २०२२ मधील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि आशिया चषक खेळू शकला नव्हता. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी KL राहुल आणि श्रेयस अय्यरवरील अनिश्चितता होती. रिषभ पंतचाही गंभीर अपघात झाला होता.

शिबिर आणि प्रत्येक खेळाडूचा फिटनेस अहवाल संघ व्यवस्थापन आणि निवड समितीला ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी अंतिम संघ निवडण्यात मदत करेल.