ICC WOMENS U19 T20 WORLD CUP 2023: फायनलपूर्वी टीम इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी 'नीरज चोप्रा' मैदानात; BCCI ने शेअर केले खास फोटो

neeraj chopra meet team india: अंडर-19 विश्वचषकामध्ये आज भारत आणि इंग्लंड यांच्यात अंतिम सामना होणार आहे.

सध्या दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर अंडर-19 महिला ट्वेंटी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. आज या स्पर्धेतील अंतिम सामना होणार असून भारत आणि इंग्लंड हे बलाढ्य संघ आमनेसामने असणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 5.30 वाजता सुरू होईल.

भारतीय अंडर-19 महिला संघ आता विजेतेपदापासून फक्त एक पाऊल दूर आहे. स्फोटक फलंदाज शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आतापर्यंत या स्पर्धेत चमकदार खेळ केला असून आता अंतिम फेरीत विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यावर टीम इंडियाची नजर असेल.

भारतीय संघ अंतिम सामन्यासाठी कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. यामुळेच संघ खेळाव्यतिरिक्त मानसिक बळावर काम करत आहे.

जेतेपदाच्या सामन्याच्या तयारीत असलेल्या टीम इंडियाला फायनलच्या एक दिवस आधी एका खास पाहुण्याला भेटण्याची संधी मिळाली, त्यामुळे खेळाडूंमध्ये उत्साहाची लाट उसळली आहे. खरं तर भारताचा ऑलिम्पिकवीर सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याने भारतीय मुलींचे मनोबल वाढवले आहे

यादरम्यान नीरजने मुलींना प्रोत्साहन देण्यासोबतच फायनलच्या दबावाला तोंड देण्यासाठी महत्त्वाच्या टिप्सही दिल्या. बीसीसीआयने नीरज चोप्रा आणि भारतीय संघ यांच्यातील भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये नीरज आपला अनुभव भारतीय खेळाडूंसोबत शेअर करताना दिसत आहे. या खास प्रसंगी टीम इंडियाची ट्रेनिंग जर्सीही नीरजला भेट देण्यात आली.

यानंतर नीरजने जर्सी घातलेल्या सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसोबत फोटो काढले.

लक्षणीय बाब म्हणजे भारतीय महिला क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय स्तरावर बरेच यश संपादन केले आहे, परंतु संघाला कोणत्याही स्तरावर विश्वचषक ट्रॉफी जिंकता आलेली नाही.

अंडर-19 संघाची कर्णधार शेफाली वर्मा ही दोनवेळा विश्वचषकांच्या अंतिम फेरीत सहभागी झालेल्या संघाची भाग राहिली आहे. तसेच वरिष्ठ संघासह एक राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा अंतिम सामना देखील शेफालीने खेळला आहे.