R Ashwin: गावस्कर आणि सेहवाग यांच्यानंतर 'मुरली विजय' कसोटीतील महान सलामीवीर - आर अश्विन

r ashwin on murali vijay: गावस्कर आणि सेहवाग यांच्यानंतर 'मुरली विजय' कसोटीतील महान सलामीवीर - आर अश्विन

सध्या भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

पहिल्या सामन्यात भारतीय फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांच्या शानदार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव झाला. त्यामुळे दिल्लीत होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात फिरकीपटू रविचंद्रन अश्विनच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. दुसऱ्या सामन्याच्या तोंडावर अश्विनने एक मोठे विधान करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.

नागपूर कसोटीमध्ये रविचंद्रन अश्विननने दुसऱ्या डावात 5 बळी घेऊन भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली. आता अश्विनने भारतीय संघाचा माजी खेळाडू मुरली विजयचे तोंडभरून कौतुक केले.

खरं तर अलीकडेच मुरली विजयने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. अश्विनने ईएसपीएन क्रिकइन्फोशी संवाद साधताना म्हटले, "सुनिल गावस्कर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यानंतर मुरली विजय भारतीय संघाचा महान सलामीवीर राहिला आहे. नवीन खेळपट्टीवर शानदार पद्धतीने खेळण्याची त्याच्यात क्षमता आहे."

"मुरली विजय चेंडू जुना करायचा आणि नंतर येणाऱ्या फलंदाजांचा मार्ग सोपा व्हायचा. भारतीय संघासाठी त्याने हे काम प्रदीर्घ काळ केले पण त्याला कसोटी क्रिकेटपटू म्हणून तो सन्मान मिळाला नाही ज्यासाठी तो पात्र होता", असे अश्विनने अधिक सांगितले.

अश्विनने आपल्या वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे. कारण सचिन तेंडुलकरसारख्या दिग्गजांचे नाव न घेता त्याने मुरली विजयला सर्वोत्कृष्ट म्हटले आहे. तसेच त्याचा कसोटी फॉरमॅटमधील महान खेळाडू असा उल्लेख केला आहे.

रविचंद्रन अश्विनने मुरली विजयवर झालेल्या अन्यायाबद्दल भाष्य केले. माजी खेळाडू मुरली विजयने भारतासाठी 61 कसोटी सामन्यांमध्ये 38.29 च्या सरासरीने 3,982 धावा केल्या आहेत, ज्यात 12 शतके आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे.

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अश्विनने 8 बळी घेऊन कांगारू संघाची कंबर मोडली होती. यासह अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 450 बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत 89 कसोटी सामन्यांमध्ये 457 बळी घेतले आहेत.

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत, इशान किशन, श्रेयस अय्यर, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सूर्यकुमार यादव.