MS Dhoniचा तीन वर्षांचा Future Plan ठरलाय!

कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) पुढील सुचनेपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेला.

आयपीएल स्पर्धा पहिल्यांदा पुढे ढकलण्यात आल्यानंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी चेन्नईहून रांचीत परतला. आता आयपीएल पुढील सुचनेपर्यंत स्थगित केल्यानंतर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत.

गतवर्षी झालेल्या वन डे वर्ल्ड कपनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहे. टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी आयपीएल हा एकमेव पर्याय त्याच्यासमोर होता.

आता आयपीएल स्पर्धेवर अनिश्चिततेचं सावट आल्यामुळे चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधाराच्या भविष्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.

धोनी नऊ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. त्याला टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल, असे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सांगितले होते.

आयपीएलच रद्द होण्याच्या उंबरठ्यावर असल्यानं धोनी कधीही निवृत्ती जाहीर करेल, असा अंदाज बांधला जात आहे.

लॉकडाऊनच्या काळात धोनी कुटुंबीयांना पुरेसा वेळ देत आहे. त्याचबरोबर तो त्याच्या फिटनेसवरही मेहनत घेत आहे.

धोनीच्या जवळच्या मित्रानं सांगितले की धोनी आणखी तीन वर्ष तरी आयपीएल खेळण्यास उत्सुक आहे. शरिरानं साथ दिल्यास आणखी तीन वर्ष आयपीएल खेळण्याचा निर्णय धोनीनं घेतल्याचा सूत्रांनी सांगितले.

याशिवाय धोनीला झारखंडच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी काम करायचे आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

सूत्रांच्या माहितीनुसार धोनीला आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचे नाही. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून धोनी टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी उत्सुक आहे, अशी सुरू असलेली चर्चा चुकीची आहे, असेही सूत्रांनी सांगितले. या आशयाचे वृत्त Sportskeeda या वेबसाईटनं प्रसिद्ध केलं आहे.