क्रिकेटरच नाही बिझनेसमन धोनी! हॉटेल ते एयरोस्पेस पर्यंत पसरलाय व्यवसाय, नेटवर्थ जाणाल तर...

धोनीकडे सुमारे १००० कोटींहून अधिक संपत्ती आहे. क्रिकेट आणि जाहिरातींतून होणारी कमाई धोनीने अशाप्रकारे गुंतविली आहे की ती हळहळू का होईना त्याला उत्पन्न देत आहे.

कॅप्टन कूल धोनीच्या टीमने पाचव्यांदा आयपीएल चषक जिंकला आहे. या सामन्यातही धोनीच्या संघाला अखेरच्या चेंडूपर्यंत झगडावे लागले होते. गुजरात टायटंसला चेन्नईच्या संघाने पाच धावांनी हरविले. या सामन्यानंतर महेंद्रसिंह धोनी निवृत्तीची घोषणा करेल असे सर्वांना वाटत होते, त्यामुळे पिवळ्या जर्सीची यंदाच्या आयपीएलमध्ये मोठी हजेरी होती. परंतू, त्याने तसे केलेले नाहीय.

धोनीने निवृत्त होण्यापूर्वी आपली पुढची सोय करून ठेवली आहे. २०२० मध्येच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला बायबाय केला होता. सध्या आयपीएलमध्ये खेळत असला तरी पुढील हंगामात तो निवृत्त होईल. यानंतर उत्पन्न आणि बिझी राहण्यासाठी धोनीने हॉटेल व्यवसाय ते एअरोस्पेसपर्यंत पैसे गुंतविले आहेत. यामुळेच धोनीला सर्वात श्रीमंत स्पोर्टपर्सनपैकी एक मानले जाते.

एका रिपोर्टनुसार धोनीकडे सुमारे १००० कोटींहून अधिक संपत्ती आहे. क्रिकेट आणि जाहिरातींतून होणारी कमाई धोनीने अशाप्रकारे गुंतविली आहे की ती हळहळू का होईना त्याला उत्पन्न देत आहे. धोनीने अनेक छोट्या मोठ्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे.

यामध्ये कपड्यांपासून हॉटेल आणि स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपन्यांचाही समावेश आहे. कोणकोणत्या व्यवसायांत धोनीची गुंतवणूक आहे, आणि कुठून कुठून त्याला कमाई होते, ते जाणून घेऊयात...

महेंद्रसिंग धोनीचा रिती स्पोर्ट्स नावाच्या मॅनेजमेंट कंपनीत हिस्सा आहे. या स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून जगातील अनेक मोठ्या आणि दिग्गज खेळाडूंचे व्यवस्थापन कार्य हाताळले जाते. फाफ डु प्लेसिस, रोहित शर्मासारखे खेळाडू या कंपनीचे ग्राहक आहेत.

धोनीने 2016 मध्ये त्याचा कपडे आणि फुटवेअर ब्रँड सेव्हन लाँच केला आहे. या कंपनीत धोनीची संपूर्ण मालकी आहे.धोनीने खाद्यपदार्थ आणि पेयांमध्येही गुंतवणूक केली आहे. धोनीने फूड अँड बेव्हरेज स्टार्ट-अप 7 इन ब्रूजमध्येही गुंतवणूक केली आहे. Copter 7 नावाचा चॉकलेट ब्रँडही लॉन्च केला आहे. हा ब्रँड त्याच्या हेलिकॉप्टर शॉटपासून प्रेरित आहे.

एक फिट क्रिकेटर म्हणून धोनीची जगभरात ओळख आहे. यामुळेच त्याने फिटनेसला प्रोत्साहन देण्यासाठी एक साखळी सुरू केली, ज्याचे नाव धोनी स्पोर्ट्सफिट आहे. देशभरात एकूण 200 हून अधिक फिटनेस चेन खुल्या आहेत.

धोनीने हॉकी आणि फुटबॉल संघात गुंतवणूक केली आहे. धोनी इंडियन सुपर लीगमधील चेन्नईयन एफसी या फुटबॉल संघाचा मालक आहे. एवढेच नाही तर तो रांची रेज या हॉकी संघाचा सहमालकही आहे.

महेंद्रसिंग धोनीने बंगळुरूमध्ये शाळा सुरू केली आहे. धोनीच्या शाळेचे नाव 'एमएस धोनी ग्लोबल स्कूल इंग्लिश मीडियम' आहे. धोनीच्या शाळेचे सॉफ्टवेअर दिग्गज मायक्रोसॉफ्टशी टाय-अप आहे, जे प्रोग्रामिंगसारखे अभ्यासक्रम शिकवते.

धोनीने चित्रपटसृष्टीतही हात आजमावला आहे. धोनीने धोनी एंटरटेनमेंट नावाचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले आहे. लेट्स गेट मॅरेज या त्याच्या निर्मितीमध्ये पैसे गुंतवले गेले आहेत. हा एक तमिळ चित्रपट आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले.

धोनीने शाका हॅरी नावाच्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. ही कंपनी वनस्पती आधारित प्रथिने बनविण्याचे काम करते. धोनीशिवाय शाका हॅरी नावाच्या या स्टार्टअपमध्ये मनू चंद्रासारखे गुंतवणूकदार आहेत.

धोनीने एका तंत्रज्ञान कंपनीतही गुंतवणूक केली आहे. गरुड एरोस्पेस असे या कंपनीचे नाव आहे. धोनी या कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडरही आहे. या कंपनीचे मुख्य काम ड्रोन बनवणे हे आहे.

झारखंडची राजधानी रांचीमध्येही माही रेसिडेन्सी नावाचे हॉटेल आहे. धोनीचे हे एकमेव हॉटेल आहे. धोनी एका टीव्ही जाहिरातीसाठी 3.5 कोटी ते 6 कोटी रुपये घेतो. वर्षाला तो 54 वेगवेगळ्या कंपन्यांच्या जाहिराती करतो. तसेच चेन्नई सुपर किंग्ज धोनीसाठी 12 करोड़ रुपये मोजते ते वेगळेच.