दुध, टोमॅटोनंतर MS Dhoniच्या शेतातील ऑरगॅनिक कॉलिफ्लॉवरला तुफान मागणी

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) सध्या शेतीकामात व्यग्र आहे. रांचीच्या भाजी बाजारामध्ये धोनीच्या शेतमालाला प्रचंड मागणी आहे. मटार आणि टोमॅटोनंतर धोनीच्या शेतातील ऑरगॅनिक कॉलिफ्लॉवरला मोठी मागणी आहे.

तीन वर्षांपूर्वी धोनीने धुर्वा येथील सेंबो फॉर्म हाऊसमध्ये शेती आणि डेअरी व्यवसायाला सुरुवात केली होती. आता तेथे मोठ्या प्रमाणावर भाज्या आणि दुधाचे उत्पादन होत आहे. ईजा फॉर्म नावाच्या ब्रँडने येथील उत्पादनांची विक्री होत आहे. नुकतीच येथे टोमॅटो आणि दुधाची विक्री सुरू झाली होती.

आता ऑरगॅनिक कॉलिफ्लॉवरला रांचीच्या बाजारात मागणी आहे. बर्मी कंपोस्ट आणि शेणखत वापरून या ऑरगॅनिक कॉलिफ्लॉवरचं उत्पादन घेण्यात आले आहे. २० ते २५ रुपये किलोने विकला जाणाऱ्या या कॉलिफ्लॉवरची चव हे केमिकलयुक्त भाजीपेक्षा वेगळी आहे. धोनीच्या शेतातल्या कॉलिफ्लॉवरचं वजन अर्धा किलो ते एक किलोच्या दरम्यान आहे.

या शेतीची जबाबदारी स्वीकारणाऱ्या शेतकरी निर्मल यादव यांनी सांगितलं की, 'कॉलिफ्लॉवरचा खूप सांभाळावं लागतं, कारण हे पूर्णपणे ऑरगॅनिक आहे. बाजारात धोनीच्या नावाने तो विकला जातो. संपूर्णपणे बर्मी कंपोस्ट आणि शेणखत वापरल्यामुळे याची चवही चांगली आहे.'

माहीच्या शेतातील टोमॅटोंना बाजारात 40 रु. किलो भाव असून. 80 किलो टोमॅटोंपैकी 71 किलो टोमॅटो विकले गेले आहेत.

विशेष म्हणजे धोनीने आपल्या फॉर्म हाऊससाठी कडकनाथ कोंबड्यांची पिल्लंदेखील मागवली आहेत. धोनीच्या फार्म हाऊसमध्ये जवळपास 2 हजार कोंबडे आहेत

शिवनंदन यांनी सांगितले, येथील दूध 55 रु. लिटर विकले जात आहे. यात कसल्याही प्रकारची भेसळ नाही. पंजाबवरून एकूण 60 गाई आणण्यात आल्या होत्या. जर्सी आणि शहवाल जातीच्या गाईंच्या दूधाची विक्री बाजारात केली जात आहे.