IPL 2023नं भारताच्या अनुभवी गोलंदाजाला 'चमकवलं', तब्बल 8 वर्षांनंतर दिसली जुनी 'धार'

Mohit Sharma ipl 2023 : भारतीय संघाचा अनुभवी गोलंदाज मोहित शर्मासाठी आयपीएलचा सोळावा हंगाम अप्रतिम राहिला.

भारतीय संघाचा अनुभवी गोलंदाज मोहित शर्मासाठी आयपीएलचा सोळावा हंगाम अप्रतिम राहिला. त्यानं आपल्या शानदार गोलंदाजीनं भल्याभल्यांना घाम फोडला. गुजरात टायटन्सचा प्रभावी गोलंदाज म्हणून त्यानं कारभार सांभाळला.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरातला फायनलमध्ये पोहचवण्यात मोहितने महत्त्वाची भूमिका पार पाडली. खरं तर मोहित मोठ्या कालावधीनंतर चर्चेत आला आहे.

मोहित शर्मा मागील हंगामात गुजरातचा नेट गोलंदाज होता. फायनलच्या सामन्यात मोहित शर्माने रंगत आणली अन् गुजरातच्या चाहत्यांना जागं केलं. चेन्नईनं चमकदार कामगिरी करून सामना एकतर्फी करण्याचा प्रयत्न केला. पण मोहितनं सलग दोन बळी घेऊन गतविजेत्यांचं पुनरागमन केलं.

अखेरच्या षटकात १४ धावांचा बचाव करण्यासाठी कर्णधार पांड्यानं मोहितकडे चेंडू सोपवला होता. पहिल्या ४ चेंडूत त्यानं केवळ ४ धावा दिल्या. शेवटच्या २ चेंडूवर १० धावांची गरज असताना मात्र रवींद्र जडेजाने बाजी मारली.

पाचव्या चेंडूवर षटकार आणि सहाव्या चेंडूवर चौकार ठोकून जड्डूनं गतविजेत्यांना पराभवाची धूळ चारली. पराभवानंतर हार्दिक पांड्यानं मोहित शर्माला मिठी मारली अन् धीर दिला.

मोहितने यंदाच्या आयपीएलमधील १४ सामन्यांमध्ये २७ बळी घेतले. याशिवाय पर्पल कॅपच्या शर्यतीत सहकारी खेळाडू मोहम्मद शमीच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर राहिला.

भारतासाठी २०१५ च्या विश्वचषकातील उपांत्य फेरीचा सामना खेळल्यानंतर मोहित जवळपास क्रिकेटपासून गायब झाला होता. पण तब्बल आठ वर्षानंतर या अनुभवी गोलंदाजाने आपली छाप सोडली आहे.

चेन्नईनं फायनलचा सामना जिंकला असला तरी मोहित शर्मानं आणलेली रंगत चाहत्यांना भावली. सामन्यानंतर महेंद्रसिंग धोनीपासून रवींद्र जडेजासह चेन्नईच्या खेळाडूंनी देखील आपल्या माजी सहकाऱ्याचे कौतुक केले.

गुजरात टायटन्सला फायनलच्या सामन्यात अखेरच्या चेंडूवर पराभूत करून धोनीच्या चेन्नईने पाचव्यांदा आयपीएलचा किताब उंचावला. अखेरच्या षटकांतील शेवटच्या २ चेंडूवर १० धावांची गरज असताना रवींद्र जडेजाने अनुभवाचे कौशल्य दाखवले.

मोहित शर्माच्या पाचव्या चेंडूवर षटकार ठोकून त्यानं चाहत्यांना जागं केलं. तर, अखेरचा चेंडू जड्डूच्या पायाला लागून सीमीरेषेकडं गेला अन् चेन्नईच्या खेळाडूंसह चाहत्यांनी एकच जल्लोष केला.