IND vs ENG : बुमराहमुळं सिराजकडे दुर्लक्ष व्हायचं; आता तो पिक्चरमध्ये आला अन् हे दोघे पडद्याआड

सिराजनं गेलेली मॅच जिंकून दिली, पण या दोघांनी मॅचमध्ये खरं ट्विस्ट आणलं

लंडन येथील ओव्हलच्या मैदानात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय नोंदवला. परदेशातील मैदानात पहिल्यांदाच मालिकेतील शेवटचा सामना जिंकण्यात टीम इंडियाला यश आले.

शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघाच्या नव्या पर्वाची सुरुवात मालिका विजयाने झाली नसली तरी ओव्हलचं मैदान मारत टीम इंडियाने पराभवाची नामुष्की टाळली. रोहित, विराट आणि अश्विनसह जसप्रीत बुमराहच्या पार्ट टाइम जॉबसह मालिका बरोबरीत सोडवणं म्हणजे हा एक मोठा विजयच आहे.

५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत पिछाडीवर असताना दमदार कमबॅकसह बरोबरीचा डाव साधण्यात संघातील प्रत्येकाने आपली भूमिका चोख बजावली.

बुमराह असताना नेहमी दुर्लक्षित राहणाऱ्या मोहम्मद सिराज याने दुसऱ्या डावात 'पंजा' मारत भारतीय संघाला अशक्यप्राय वाटणारा सामना जिंकून दिला. अन् तो पिक्चरमध्ये आला.

पण या सामन्यात खरा ट्विस्ट आणला ते मात्र कुठंतरी पिक्चरमधून थोडे गायब झाल्यासारखे दिसले. सिराजची चर्चा होणं ही काही चूक नाही. पण ज्यांनी सामन्यात ट्विस्ट आणलं त्यांनाही विसरुन चालणार नाही.

बर्मिंगहॅमचा हिरो आकाशदीप यानं ओव्हलच्या मैदानात इंग्लंडच्या दुसऱ्या डावात २० षटके गोलंदाजी केली. इंजेक्शन घेऊन तो मैदानात उतरला होता. त्याने फक्त एक विकेट घेतली. पण मॅचला कलाटणी देणारी होती. कारण शतकवीर हॅरी ब्रूकला त्याने तंबूत धाडले होते. तो थांबला असता तर हा सामना खूप लवकर संपला असता.

प्रसिद्ध कृष्णा यानेही सिराजला उत्तम साथ दिली. त्याने दोन्ही डावात चार विकेट्सचा डाव साधला.

प्रसिद्ध कृष्णानं चौथ्या दिवसाच्या अखेरीस शतकवीर जो रुटची विकेट घेतली अन् तिथं सामना फिरला. हा मॅचचा खरा टर्निंग पाइंट ठरला.