Mayanti Langer Dinner Date: मयंती लँगरला चाहत्याने दिली 'डिनर डेट'ची ऑफर; तिनेही दिलं एकदम 'स्मार्ट' उत्तर

मयंती लँगर दोन वर्षांनी पुन्हा IPLमध्ये अँकरिंग करताना दिसतेय

Mayanti Langer IPL 2022: सध्या भारतात आणि विशेषत: मुंबई-पुण्यात आयपीएलीची धामधूम सुरू आहे. यंदाच्या हंगामात दोन नवीन संघांचा समावेश झाल्याने एकूण १० संघांची स्पर्धा रंगली आहे. याशिवाय, गेली दोन वर्षे अँकरिंगपासून दूर असलेली मयंती लँगर बिनी हीदेखील या वर्षीपासून पुन्हा IPL मध्ये दिसू लागली आहे.

अनुभवी टेलिव्हिजन अँकर आणि क्रिकेटमधील प्रसिद्ध चेहरा असलेल्या मयंती लँगरने यंदाच्या IPL हंगामातून अँकरिंगसाठी पुनरागमन केले. यंदाच्या आयपीएलमधून ती पुन्हा चाहत्यांना दिसू लागली. तिच्या येण्याने IPL पाहायला अजून छान वाटते, अशा आशयाच्या प्रतिक्रिया अनेकांनी सोशल मीडियावर दिल्या.

मयंतीने काही महिन्यांपूर्वीच एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळाच्या जन्मामुळे ती IPL च्या दोन सीझनमध्ये दिसली नव्हती. पण आता ती पुन्हा आयपीएलच्या ब्रॉडकास्टिंग टीमचा भाग झाली आहे.

IPL च्या 2020 सीझनमध्ये जेव्हा मयंती दिसली नाही, तेव्हा जगभरातील अनेक चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्या मुद्द्यावरून चाहत्यांनी अनेक तर्कवितर्क लढवले. पण मयंतीनेच या चर्चांना पूर्णविराम दिला.

मयंतीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून आपण आई होणार असल्याची गोड बातमी साऱ्यांना दिली, त्यानंतर चर्चा बंद झाल्या. भारतीय क्रिकेटर स्टुअर्ट बिन्नीसोबत तिने लग्न केले आहे.

"मी गेली पाच वर्षे मोठमोठ्या इव्हेंट्समध्ये अँकरिंग केले. पण मी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळे मी काही काळ विश्रांती घेतली आहे", असे तिने सांगितले होते.

त्यानंतर मयंती पुन्हा एकदा यंदाच्या IPLमध्ये दिसताच तिचा चाहतावर्ग सुखावला. याआधीही अनेक चाहत्यांनी तिच्यावरील प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. पण यावेळी एका चाहत्याने तिला डेटसाठी विचारले.

"जेव्हा मी तुला पाहतो, त्यावेळी मला IPL पाहायला अधिक छान वाटते. तू क्लास आहेस. मला तू खूप आवडतेस. मला तुला डेटवर घेऊन जाण्याची इच्छा आहे. तू किती सुंदर दिसतेस हे सांगण्यासाठी माझे शब्दही अपुरे आहेत", असे ट्वीट फहाद खान (@fahadkhan616) या चाहत्याने केले.

मयंतीने देखील त्यावर अतिशय सुंदर आणि क्यूट रिप्लाय दिला. 'तुमच्या इच्छेचा मला आदर आहे. मी आणि माझे पती, आम्हा दोघांना तुमच्यासोबत जेवायला नक्कीच आवडेल.", असा स्मार्ट रिप्लाय मयंतीने दिला.