Manish Pandey: मनीष पांडेने षटकारांचा पाऊस करत ठोकले द्विशतक; अर्जुन तेंडुलकरच्या संघाची उडाली दाणादाण

Ranji Trophy Live: सध्या रणजी ट्रॉफीमध्ये गोवा आणि कर्नाटक यांच्यात सामना खेळवला जात आहे.

रणजी ट्रॉफी 2022-23 मध्ये आज म्हणजेच 28 डिसेंबर रोजी गोवा विरुद्ध कर्नाटक यांच्यातील सामन्याचा दुसरा दिवस खेळवला गेला. गोवा क्रिकेट असोसिएशनमध्ये या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये भारतीय संघातून बाहेर पडलेल्या मनीष पांडेने शानदार फलंदाजी केली.

आपल्या ताबतोब फलंदाजीने त्याने मैदानात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला अन् गोव्याच्या गोलंदाजांना घाम फोडला. एवढेच नाही तर आयपीएलमध्ये ऋषभ पंतच्या संघात सामील होताच त्याने झंझावाती द्विशतकही ठोकले आहे. यापूर्वी तो लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाचा भाग होता.

पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत कर्नाटकच्या संघाने 3 गडी गमावून 294 धावा केल्या होत्या. मनीष पांडेने दुसऱ्या दिवशी 8 धावा करत डावाला सुरुवात केली. त्याने अर्जुन तेंडुलकरसह गोव्याच्या सर्व गोलंदाजांना झोडपून काढले. मनीष पांडे मैदानावर येताच गोलंदाजांची पळता भुई थोडी झाली.

आक्रमक खेळी करताना मनीष पांडेने गोवाविरूद्ध द्विशतक झळकावले. यादरम्यान त्याने 111 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 186 चेंडूंचा सामना करताना नाबाद 208 धावा केल्या. त्याच्या खेळीत 14 चौकार आणि 11 षटकारांचा समावेश होता.

तत्पुर्वी, कर्नाटकच्या संघाचा कर्णधार मयंक अग्रवालने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत कर्नाटकच्या फलंदाजांनी शानदार खेळी केली. सलामीवीर फलंदाज मयंक अग्रवाल आणि रविकुमार समर्थ यांनी पहिल्या बळीसाठी 116 धावांची भागीदारी नोंदवली. यादरम्यान रवी कुमारने आपले शतक तर मयंकने अर्धशतक पूर्ण केले.

यानंतर मनीष पांडेने शानदार द्विशतकी खेळी केली. कर्नाटकने आपल्या पहिल्या डावात 7 बळींच्या नुकसानात 603 धावांचा डोंगर उभारला. मात्र, 7 गडी माघारी परतल्यानंतर कर्णधार मयंक अग्रवालने डाव घोषित केला.

कर्नाटकच्या फलंदाजांनी गोव्याच्या गोलंदाजांची धुलाई करून सामन्यात पकड बनवली आहे. गोवा संघाचे गोलंदाज बळी घेण्यासाठी धडपडताना पाहायला मिळाले. या सामन्यात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर गोवा संघाकडून खेळताना काही खास कामगिरी करू शकला नाही. अर्जुनने 26.4 षटके गोलंदाजी केली आणि 79 धावा देत फक्त 2 बळी घेतले.