ट्वेंटी-२० तून वगळलं, BCCIने केली पगारकपात; कर्णधारपदाच्या जोरावर IPL खेळतोय रोहितचा फ्लॉप मित्र

kl rahul ipl team 2023 : भारताच्या कसोटी आणि ट्वेंटी-२० संघामधून वगळल्यानंतर संघाचा माजी उपकर्णधार सध्या संघर्ष करत आहे.

भारताच्या कसोटी आणि ट्वेंटी-२० संघामधून वगळल्यानंतर संघाचा माजी उपकर्णधार सध्या संघर्ष करत आहे. मोठ्या कालावधीपासून खराब फॉर्मचा सामना करत असलेला लोकेश राहुल अद्याप पुनरागमन करण्यात अपयशी ठरला आहे. खरं तर आयपीएल २०२३ मध्ये चांगली कामगिरी करून टीकाकारांना प्रत्युत्तर देण्याचे राहुलसमोर आव्हान आहे.

आयपीएल २०२३ ची नुकतीच सुरूवात झाली आहे, मात्र लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल धावा करण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. लखनौच्या संघाने मागील हंगामात प्लेऑफपर्यंत मजल मारली होती.

लोकेश राहुलच्या शानदार फॉर्ममुळे लखनौने पदार्पणाच्या हंगामात चमक दाखवली होती. पण आयपीएलच्या १६व्या हंगामात राहुलचा खराब फॉर्म संघाची डोकेदुखी वाढवत आहे.

यंदाच्या हंगामातील पहिल्या ३ सामन्यांमध्ये राहुलने एकाही सामन्यात साजेशी खेळी केली नाही.

राहुलने या हंगामातील ३ सामन्यांमध्ये केवळ ६३ धावा केल्या आहेत. १०३ च्या स्ट्राईक रेटने धावा करताना राहुलला अनेकदा संघर्ष करावा लागला.

आयपीएलच्या आधी देखील तो खराब फॉर्मचा सामना करत होता. खराब फॉर्ममुळे त्याला सुरूवातीला भारताच्या ट्वेंटी-२० संघातून वगळण्यात आले आणि नंतर ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पहिले २ सामने खेळल्यानंतर त्याचा पत्ता कट झाला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अखेरच्या २ सामन्यांसाठी संघ जाहीर झाला तेव्हा राहुलची उपकर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर तो प्लेइंग इलेव्हनमध्ये देखील बाहेर झाला होता.

रोहित शर्माचा जवळचा सहकारी लोकेश राहुलच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आयपीएल २०२३ मध्ये शानदार कामगिरी करून भारताच्या ट्वेंटी-२० संघात पुनरागमन करण्याचे राहुलसमोर आव्हान असेल.

अलीकडेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 2022-23 या वर्षासाठी भारतीय खेळाडूंची वार्षिक करार यादी जाहीर केली. त्यामध्ये राहुलचे डिमोशन झाल्याचे पाहायला मिळाले. लोकेश राहुलचे डिमोशन झाले असून त्याची ए ग्रेडवरून बी ग्रेडमध्ये घसरण झाली आहे.

ए ग्रेडमध्ये असलेल्या खेळाडूंना बीसीसीआय वार्षिक करारानुसार ५ कोटी रूपये देते. तर बी ग्रेडमध्ये असलेल्या खेळाडूंना बीसीसीआयकडून ३ कोटी रूपये मिळतात. एकूणच राहुलची २ कोटी पगारकपात करण्यात आली आहे.