टाईम आऊट सोडा, क्रिकेटचे असे पाच नियम जे खेळाडूंच्या डोक्यात जातात; तुम्हीही चक्रावाल

क्रिकेटच्या विश्वात काल एक खळबळजनक घटना घडली. असेच काही नियम आहेत, जे खेळाडूंनाच नाही तर प्रेक्षकांनाही भंडावून सोडतात.

क्रिकेटच्या विश्वात काल एक खळबळजनक घटना घडली. फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज येण्यास उशीर झाल्याने त्याला बाद देण्यात आले. श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजबरोबर हा प्रकार घडला. याबरोबर या नियमाची चर्चा सगळीकडे झाली. असेच काही नियम आहेत, जे खेळाडूंनाच नाही तर प्रेक्षकांनाही भंडावून सोडतात.

क्रिकेटमध्ये स्टम्पवरील बेल्सची महत्वाची भूमिका असते. आता तर बेल्स अस्थिर झाली की सेन्सरमुळे लाल लाईट पेटते. यामुळे विकेटकिपर किंवा फिल्डरने स्टम्पला स्पर्श केला आणि बेल्स त्यापासून वेगळ्या होत असतानाचा अचूक टायमिंग ओळखता येतो. परंतू, नियमानुसार बेल्सशिवायही मॅच खेळली जाऊ शकते. वेस्ट इंडिज आणि अफगानिस्तानमध्ये अशी मॅच झाली होती. वेगवान हवेमुळे हा निर्णय घेण्यात आला होता.

क्रिकेटमध्ये असा नियम आहे की क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने फलंदाजाविरुद्ध अपील केले नाही, तर तो बाद झाला तरी त्याला आऊट दिले जात नाही.

क्रिकेटच्या नियमांनुसार, जर एखाद्या फलंदाजाच्या हातात बॅट नसेल आणि चेंडू त्या हाताच्या ग्लोव्हला स्पर्श करून क्षेत्ररक्षकाकडे गेला व झेल टिपला तर त्याला आऊट दिले जात नाही. त्याने बॅट पकडलेल्या हाताच्या ग्लोव्हला चेंडू आदळला तरच त्याला बाद केले जाईल. 2014 मध्ये श्रीलंकेच्या रंगना हेराथसोबत एकदा असे घडले होते.

हेल्मेटमुळे खेळाडूंना संरक्षण मिळते. परंतू, काही वेळा यामुळे संघाचं नुकसानही होते. वेगवान गोलंदाजीवेळी मैदानावर यष्टीरक्षक हेल्मेट ठेवतो. त्याला चेंडू लागल्यास फलंदाजी करणाऱ्या संघाला दंड म्हणून ५ रन्स दिले जातात.

मैदानावर चेंडूला अडथळा निर्माण झाला तर दंड म्हणून ५ धावा दिल्या जातात, पण हवेत असेच काही घडले तर तो चेंडू डेड बॉल म्हणून घोषित केला जातो. किंबहुना, फलंदाज जेव्हा एरियल शॉट खेळतो तेव्हा चेंडू स्पायडर कॅमवर आदळतो असे अनेकवेळा दिसून आले आहे. अशा स्थितीत पंच त्या चेंडूला डेड समजतात.