भारताकडून पहिले कसोटी शतक झळकावणाऱ्या खेळाडूवर महिलांनी केला होता दागिण्यांचा वर्षाव

भारतात पहिला कसोटी सामना 1933 मध्ये मुंबईतील(तेव्हाचे बॉम्बे) जिमखाना स्टेडियमवर खेळला गेला होता. त्या सामन्यात लाला अमनरनाथ यांनी पहिले कसोटी शतक झळकावले होते. वाचा हा ऐतिहासिक किस्सा...

तुम्ही क्रिकेटबद्दल अनेक किस्से ऐकले असतील. पण, आज आम्ही तुम्हाला भारताच्या पहिल्या कसोटी शतकाविषयी सांगणार आहोत. भारतात इंग्रजांनी क्रिकेटची सुरुवात केली. ब्रिटीश काळातही भारतात क्रिकेट खेळले जायचे आणि भारताची स्वतंत्र टीमही होती.

सुरुवातीला कसोटी सामने खेळे जात होते. भारतीय संघाने 1932 मध्ये पहिला कसोटी सामना खेळला होता. तसेच, भारतीय भूमीवर पहिला कसोटी सामना 1933 मध्ये खेळवण्यात आला होता.

भारताने आपला पहिला कसोटी सामना 25 जून 1932 रोजी लॉर्ड्सवर खेळला, तर भारतात पहिला कसोटी सामना 1933 मध्ये 15 डिसेंबरपासून मुंबईतील(तेव्हाचे बॉम्बे) जिमखाना स्टेडियमवर खेळला गेला होता.

त्या सामन्यात भारतीय बॅट्समन लाला अमरनाथ यांनी भारताकडून पहिले कसोटी शतक झळकावले होते. भारताकडून पदार्पण सामना खेळणाऱ्या अमरनाथने दुसऱ्या डावात इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलेच अडचणीत आणले.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच 17 डिसेंबरला अमरनाथ यांनी शतक ठोकले होते. त्यांनी 185 चेंडूत 21 चौकारांच्या मदतीने 118 धावांची खेळी केली होती.

अमरनाथांच्या या खेळीचा भारतीय क्रिकेटवरही खोलवर परिणाम झाला आणि ही खेळी आजही स्मरणात आहे. विशेष म्हणजे, अमरनाथ आउट होऊन मैदानातून बाहेर परतत असताना स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या काही महिलांनी त्यांच्यावर दागिन्यांचा वर्षाव केला होता.

त्यावेळी भारताचे कर्णधार सीके नायडू होते. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात भारतीय संघ अवघ्या 219 धावांवर गारद झाला. पहिल्या डावातही भारताकडून लाला अमरनाथने 38 धावा केल्या.

प्रत्युत्तरात इंग्लंडने 438 धावा केल्या. इंग्लंडकडून ब्रायन व्हॅलेंटाइनने 136 धावा केल्या, प्रत्युत्तरात भारताने 21 धावांत दोन विकेट गमावल्या होत्या. दोन्ही सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये परतले होते, मात्र कर्णधार नायडूसह अमरनाथने डाव सांभाळला.

दोघांनी मिळून 186 धावांची भागीदारी केली. नायडू 67 धावा करून बाद झाले, या दोघांशिवाय विजय मर्चंटने 30 धावांची खेळी खेळली होती. लाला अमरनाथ यांच्या शतकाच्या जोरावर भारत या सामन्यात डावाच्या पराभवापासून वाचला होता.

भारत दुसऱ्या डावात 258 धावांवर ऑल आऊट झाला आणि इंग्लंडला विजयासाठी 40 धावांचे लक्ष्य मिळाले. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने एक विकेट गमावून सामना नऊ गडी राखून जिंकला होता.

पण, लाला अमरनाथ यांची पहिली कसोटी सर्वांच्या स्मरनात राहिली. कारण, त्यांचे ते कसोटी कारकिर्दीतील हे एकमेव शतक होते. त्यांनी भारतासाठी 24 कसोटी सामने खेळले आणि 24.38 च्या सरासरीने 878 धावा केल्या.